नागपूरच्या संविधान चौकातून रणशिंग : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको

नागपूरच्या संविधान चौकातून रणशिंग : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको
-ओबीसी आंदोलन कृती समिती आंदोलन

प्रतिनिधी
नागपूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला तर तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा ओबीसी महासंघाने दिला. त्याचाच एक भाग म्हणून १० सप्टेंबरपासून नागपुरातील संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

सर्वशाखीय कुणबी, ओबीसी आंदोलन कृती समितीचे संयोजक पुरुषोत्तम शहाणे पाटील यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षणाला विरोध नाहीच. मात्र ओबीसींच्या, कुणबींच्या आरक्षणातून त्यांना सवलती देऊ नयेत. या समाजाला स्वतंत्रपणे आरक्षणाचा लाभ द्यावा, असा पुनरुच्चार संघटनेच्या वतीने करण्यात आला. आमचे आंदोलन कोणत्याही समाजाविरोधात नाही तर ते सरकारविरोधात आहे. या माध्यमातून आम्ही जनजागरणही करणार आहोत. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्यांबाबत लेखी हमी देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे शहाणे पाटील म्हणाले.

दरम्यान, उपोषण, अन्नत्याग अशा आंदोलनांच्या माध्यमातूनही विदर्भात आमचा लढा सुरू राहणार असल्याचे ओबीसी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.