नागपुरात फडणवीसांची मोठी घोषणा : झोपडपट्टीधारकांसाठी ‘गुड न्यूज’
-मनपाला टाइम बाऊंड कार्यक्रम राबविण्याचे निर्देश
गजानन ढाकुलकर
नागपूर : नागपूर शहरातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी जागेवरील झोपडपट्टीतील अतिक्रमणधारकांना स्थायी भाडेपट्टे देण्याबाबत मनपाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे; मात्र काही ठिकाणी संथगतीने काम सुरू आहे. खासगी जागेवरील स्थायी भाडेपट्टा देण्याबाबत एक नियमावली तयार करावी व जागा शासन जमा करून ऑगस्ट २०२४ पर्यंत खासगी मालकीच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना भाडेपट्टा देण्याचे निर्देश त्यांनी दिले. खासगी जागेवर असलेल्या झोपडपट्टी नियमानुसार करण्यासाठी संबंधित जागेच्या मालकांना टीडीआर मोबदला देऊन संंबंधित जागा शासन जमा करावी अशी सूचना यावेळी त्यांनी केली.
या बैठकीला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अजय चारठाणकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, उपायुक्त मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, कमलेश चव्हाण, राजेंद्र राठोड, रवींद्र बुंधाडे, अल्पना पाटणे, उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी इत्यादी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी आंबेडकर नगर, दंतेश्वरी नगर, गोपालनगर, प्रियंकावाडी, सहकार नगर, गुजरवाडी, रामटेकेनगर, रहाटे नगर टोली, राजीवनगर, चिंचभुवन शांतीनिकेतन येथील व इतर झोपडपट्ट्यांच्या संदर्भातील प्रक्रियेचा आढावा घेतला.
शासन निर्णयानुसार खाजगी जागेवरील अतिक्रमणधारकांचे अतिक्रमित क्षेत्र घोषित झोपडपट्टी म्हणून संबोधले गेले असेल तर अशा खासगी जागेवरील झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटप करण्यात येणार आहे. यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे झोपडपट्ट्यांचे सी.एफ.एस.डी., आर्चीनोव्हा आणि इमॅजिस या खासगी एजन्सीकडून पीटीएस व आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये २९८ घोषित आणि १२८ अघोषित अशा एकूण ४२६ झोपडपट्ट्या आहेत. या प्रक्रियेत नोटीस काढून नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात यावे, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.
मागील काही महिन्यांपासून नागपुरातील अनेक विकासकामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे. या कामांची गती वाढविण्याची सूचना फडणवीस यांनी केली. मनपाची तक्रार निवारण यंत्रणा गतिमान करण्यात यावी. तसेच गडरलाईनच्या समस्यांवर नागरिकांना दिलासा मिळावा व त्यांच्या समस्येचे समाधान व्हावे यादृष्टीने प्राधान्याने कार्य करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. पावसाचे पाणी जमा होणाऱ्या भागांमध्ये प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या कामाचादेखील त्यांनी आढावा घेतला.
दरम्यान, फडणवीस यांनी देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी जनतेच्या विविध समस्यादेखील ऐकून घेतल्या. अनेक प्रकरणात संबंधित विभागांनी गंभीरतेने दखल घेण्याची सूचना त्यांनी केली.


