नाकीनऊ; नाना कंभालेंमुळे जि.प. सत्ता पक्षावर पहिला डाव

नाकीनऊ; नाना कंभालेंमुळे जि.प. सत्ता पक्षावर पहिला डाव
-मुद्धा नोटिशी न मिळाल्याचा
-येत्या काळात तापणार जि. प. चे राजकारण

प्रतिनिधी
नागपूर : सर्वसाधारण सभेच्या नोटीस किमान १० दिवसांपूर्वी नियमांनुसार पोहोचणे गरजेचे आहे. अनेक सदस्यांना नोटीस मिळाली नाही. त्यामुळे सदस्य बैठकीला अनुपस्थित आहे, असा डाव सत्तेत असूनही बंडखोर सदस्य नाना कंभाले यांनी खेळला.

त्यामुळे बैठक रद्द करून ती १५ दिवसानंतर घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे बंडखोर सदस्य नाना कंभाले व विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी करताच सत्ताधारी सदस्यांकडून प्रखर विरोध झाला. मात्र, विद्यमान उपाध्यक्षा कुंदा राऊत यांच्या पहिल्याच बैठकीत अधिकार्‍यांना धारेवर धरून लायकी काढली होती. तोच धागा पकडून विरोधी पक्षनेत्यासह सदस्यांनी संताप व्यक्त केला. विरोधकांना बंडखोराची साथ लाभल्याने प्रथमच विरोधी आवाज प्रखर जाणवला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष व सभापती पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर रिक्त झालेल्या विषय समिती सदस्यांची निवड व सभापतींना विभागांचे वाटप करण्यासाठी बुधवार १६ नोव्हेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. नव्या पदाधिकार्‍यांची निवड झाल्यानंतर पहिलीच सभा असल्याने सर्वांना उत्सुक्ता होती. परंतु, पहिल्याच सभेत बंडखोर नाना कंभाले व विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी जोरदार बॅटींग केल्याने विरोधी पक्ष प्रबळ झाल्याचे चित्र सभागृहात होते. दरम्यान सभा सुरू होताच बंडखोर नाना कंभाले यांनी १० दिवसांपूर्वी नोटीस मिळणे आवश्यक असताना अनेकांना मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.

 

 

त्यामुळे सभा रद्द करण्यासाठी आक्रमक भुमिका घेतली. त्यास विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनीही दुजोरा दिल्यानंतर सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. सत्ताधारी सदस्य उभे झाल्यानंतर माजी सभापती तापेश्वर वैद्य यांनी बाजू सावरत सध्या तरी एकाही सदस्याची याबाबत तक्रार नसल्याने अध्यक्षांनी सभा सुरू करावी, असे म्हणताच सर्व सदस्यांनी त्यास बाके वाजवून दुजोरा दिला. त्यानंतरही शांत न झाल्याने माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी १० दिवसांपूर्वी प्रशासनाने नोटीस काढावी. परंतु, कितीदिवसांपर्यंत दसस्यांना मिळावी, याबाबत कायद्यात उल्लेख नाही. त्यामुळे सभा सुरू करावी, असा मुद्दा मांडला.

त्यास प्रकाश खापरे, दुधराम सव्वालाखे, राष्ट्रवादीचे सलील देशमुख यांनी अनुमोदन दिल्यानंतर सभा सुरू झाली. परंतु, पहिल्याच बैठकीत विरोधकांचा प्रखर विरोध बघता येत्या सभा चांगल्याच वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे याच मुद्द्यावर विद्यमान उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी अधिकार्‍यांना चांगलेच सुनावले होते. याबाबत तक्रारीही झाल्या. आता मात्र पदाधिकारी झाल्याने भुमिका बदलली का? असा प्रश्न महिला सदस्यांनी केला.

-अनेकांच्या भुवया उंचावल्या
जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सदस्या शांता कुमरे यांना अध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार असताना त्यांना अध्यक्षांसह सभापती नाकारल्याने चांगल्याच चर्चेत आहे. मात्र, सभेत शेवटी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांच्याशी चर्चा केली असता आपल्याला अद्याप नोटीस मिळाली नाही. तसेच वॉट्सअ‍ॅपवर सुद्धा नाही. केवळ फोन आल्यामुळे मी बैठकीला आल्याचे त्यांनी सांगितले.

-अवंतिका लेकुरवाळे म्हणतात…
काँग्रेस गटनेता तथा महिला व बालकल्याण सभापती म्हणतात, सभेची नोटीस सर्व सदस्यांना वेळेत पोहोचली. याबाबत प्रशासनाने पोचपावत्या सर्वांना दाखविल्या. विशेष म्हणजे प्रश्न उपस्थित करणारे आतिश उमरे व नाना कंभाले यांच्या पोच पावत्यांवर स्वाक्षरी आहे. येत्या दिवसांमध्ये सर्व सदस्यांना वेळेत नोटीस पोहोचावी, यासाठी जीएडीमार्फत एक व्हाट्सअ‍ॅप ग्रुप केला जाईल. त्यावर नोटीस पाठविण्यासह पोस्टातूनही पाठवू.