नक्की वाचा ! : पवारांच्या बालेकिल्ल्यात कुठे- कुठे ‘ऑपरेशन लोटस’
-पवार कार्यक्रमाच्या निमित्त दाखल
प्रतिनिधी
अहिल्यनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू करत, राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) धक्का देण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी (दि. २) विखे यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्याला निमित्त आहे ते श्रीरामपूर जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे. ‘ऑपरेशन लोटस’चे लक्ष्य शरद पवार गट आहे. ‘डॅमेज कंट्रोल’साठी पवार कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष राहील.
कार्यक्रमाच्या निमित्ताने होणाऱ्या निष्ठावंतांच्या मेळाव्यात शरद पवार कोणता कानमंत्र देतात, याबद्दलही उत्सुकता आहे. पवार यांचा पूर्वाश्रमीचा काळ प्रवरा परिसरात गेलेला असला, तरी ते आणि विखे त्यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे. निवडणुकीच्या न्यायालयीन लढाईनंतर त्याची धार अधिक तीव्र होत गेली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पवारांचा जिल्ह्यातील दबदबा वाढला. फुटीनंतर यांनी पुन्हा जिल्ह्यात पक्ष भक्कम करण्यावर भर दिला, परंतु मंत्री विखे यांनी राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचे काम ‘ऑपरेशन लोटस’द्वारे सुरू केले. पवार गटाचे आणखी काही पदाधिकारी भाजपप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार विखे यांच्या ‘होम ग्राउंड’वर दाखल होत आहेत.
शरद पवार यांच्याशी विशेष सख्य असलेले काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव करण्यात मंत्री विखे व त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत विखे यांनी आपली जिल्ह्याच्या राजकारणावरील मांड पक्की केली, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचाही कस लागणार आहेच.
ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के हे प्रामुख्याने विखेविरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखालील प्रवरा शेतकरी मंडळास पवारांनी वेळोवेळी राजकीय ताकद दिली. काळाच्या ओघात या मंडळाची राजकीय वाताहत झाली. ‘प्रवरा’ परिसरात विखे यांची राजकीय पकड अधिक भक्कम झाली. या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलणार याकडेही लोकांचे लक्ष राहील.
जिल्ह्यात सुनीता भांगरे यांच्या प्रवेशाअगोदरच ‘ऑपरेशन लोटस’ची सुरुवात झाली आहे. श्रीरामपूरच्या १४ नगरसेवकांनी भाजपत पहिल्यांदा प्रवेश केला. आता अकोलेपासून दुसऱ्यांदा आपण मोहीम सुरू केली आहे. अनेक इच्छुक भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय केला जाईल, असे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
सहकार, शिक्षण व शेती क्षेत्रात ठसा उमटविणारे रावसाहेब म्हस्के यांच्या कार्यावर आधारित ‘शरदपर्व – सारथी अमृतरथ’ या ग्रंथाचे प्रकाशन, स्व. नाथाजी म्हस्के यांच्या पुतळ्याचे अनावरण व सहस्रचंद्र दर्शन सोहळा रविवारी सकाळी १०:३० वा. बाभळेश्वर येथे आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात असतील.


