दुःखद बातमी; पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांचे निधन
-दुबईतील रुग्णालयात सुरू होते उपचार
वृत्तसंस्था
पाकिस्तान : पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. पाकिस्तानी मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. मुशर्रफ दीर्घकाळ आजारी होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.
मुशर्रफ अनेक महिने रुग्णालयात दाखल होते. ट्विटरवर माहिती देताना त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते की, त्यांना अमायलोइडोसिस नावाच्या आजाराने ग्रासले होते, त्यामुळे त्यांचे सर्व अवयव काम करणे बंद झाले. आता रिकव्हरीला वाव उरलेला नाही.
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, अमायलोइडोसिस हा दुर्मिळ आणि गंभीर आजारांचा समूह आहे. यामध्ये मानवी शरीरात अमायलोइड नावाचे असामान्य प्रथिन तयार होऊ लागते. हृदय, मूत्रपिंड, यकृत, मज्जासंस्था, मेंदू इत्यादी अवयवांमध्ये ते जमा होऊ लागते, ज्यामुळे या अवयवांच्या ऊती योग्यरीत्या कार्य करू शकत नाहीत.


