थेट बावनकुळेचा आरोप : या लोकसभा मतदार संघात ‘सेम टू सेम वोटर’

थेट बावनकुळेचा आरोप : या लोकसभा मतदार संघात ‘सेम टू सेम वोटर’

-महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा राज्यात निवडणुका

प्रतिनिधी
पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपुष्टात आल्यानंतर आता विविध राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जात आहे. येत्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आणि निवडणुकीच्या तयारीलाही वेग आला आहे. अशातच आता महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मालेगाव, धुळे परिसरातील मतदारांच्या मतदान कार्डांमध्ये मोठा घोळ झाला असल्याचा आरोप केला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, “धुळे आणि मालेगाव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन हजारच्या वर मतदारांच्या नोंदणींमध्ये घोळ झाला आहे. या मतदारांची नोंदणी मालेगावमध्येही आहे आणि धुळे विधानसभा मतदारसंघामध्येही आहे. मतदान कार्डावरील क्रमांक, फोटो यांसारख्या सगळ्याच बाबी एकसारख्या आहेत. जर निवडणूक आयोग सगळ्या नोंदी डिजीटलायझेशनने करतो, तर ही बाब त्यांच्या लक्षात का येत नाही? हेच तीन हजार लोक धुळ्यातही मतदान करणार आणि तेच मालेगावमध्येही करणार, अशी अवस्था आहे. जर धुळ्याची जागा पाडायची असेल तर धुळ्यात मतदान करायचे आणि मालेगावची जागा पाडायची असेल तर मालेगावमध्ये मतदान करायचे, या मानसिकतेतून असे प्रकार महाराष्ट्रातील ३०-४० विधानसभा मतदारसंघांमध्ये घडले आहेत, असे मला वाटते. आम्ही आज निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातील तक्रार दाखल केली आहे. जे अधिकारी या प्रकारचे काम करतात, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी भाजपाने केली आहे.”