तुपकरांना या पक्षाची ऑफर, पुण्यात बैठकीला जाणार नाही
-राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी
प्रतिनिधी
नागपूर : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता राज्यातील आणखी एका पक्षात उभी फूट पडते काय? अशी स्थिती आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तूपकर यांनी पक्षाचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात आज शिस्तपालन आणि कोअर कमिटीची बैठक आहे. मात्र, राजू शेट्टी यांच्यासह पक्षातील वरिष्ठांबाबत जाहीर नाराजी व्यक्त करून या बैठकीला जाणार नसल्याचे रविकांत तूपकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे रविकांत तूपकर हे आता दुसऱ्या पक्षात जाणार किंवा स्वाभिमानीचाच दुसरा गट स्थापन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुण्यातील आजच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे. दरम्यान, आपण दुसऱ्या पक्षात जाणार या अफवा आहेत, असे रविकांत तूपकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, आज बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहून पुढील भूमिका ठरवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
रविकांत तुपकर हे गेल्या काही महिन्यांपासून राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पक्षातील वरिष्ठांबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करताना साधे कळवलेही जात नाही, अशी थेट नाराजी त्यांनी बोलून दाखवली होती. यावेळी रविकांत तूपकर यांनी राजू शेट्टी यांचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा राजू शेट्टींकडेच असल्याचे बोलले जात आहे. आजदेखील प्रसारमाध्यामांशी बोलताना रविकांत तूपकर म्हणाले, आम्ही आमचे म्हणणे वरिष्ठांना, राजू शेट्टींना कळवले आहे. बैठकीत नेते काय भूमिका ठरवतात हे पाहू, त्यानंतर भूमिका स्पष्ट करू, असा इशाराच रविकांत तूपकर यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटने कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीतच पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. या बैठकीत आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत असल्याचे तुपकर म्हणाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्याकडून रविकांत तुपकर यांचे नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा नंतर सुरू झाली. याला खुद्द रविकांत तुपकर यांनीही दुजोरा दिला. त्यामुळे आता तुपकर स्वाभिमानीत राहणार की वेगळा पर्याय निवडणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आशिष देशमुख यांनी रविकांत तूपकर यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. आशिष देशमुख म्हणाले होते, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी झटणारे नेते म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे. भाजपही शेतकरी हितासाठी काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे तुपकरांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यमान नेतृत्वार थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत बहुजन समाजाचा स्वाभिमान दुखावला जात असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे तुपकरांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी ऑफर देशमुख यांनी दिली आहे.


