तुकाराम मुंढेच्या कारभाराची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी

तुकाराम मुंढेच्या कारभाराची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी

-पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांना धमक्या

प्रतिनिधी
नागपूर : आमदार खोपडे प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत अशाप्रकारच्या धमक्या व अधिकारी असे वागत असेल तर ते योग्य नाही. ही गंभीर बाब आहे़. प्रश्न उचलू नये हा विशेषधिकाराचाही भंग आहे. याची चौकशी केली जाईल. मुंढेंबाबत सर्व माहिती घेऊन वस्तुदर्शक अहवाल सभागृहात मांडण्यात येईल.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कारभारावरून विधानसभागृह दहा मिनिटे तहकूब करण्याची वेळ आली. नागपूरसह विदर्भातील भाजपाच्या आमदारांनी मुंडे यांच्या निलबंनाची मागणी करीत प्रचंड घोषणाबाजीत अध्यक्षांच्या टेबलकडे धाव घेतली. त्यानंतर दहा मिनिटे सभागृह तहकूब करण्यात आले.

सभागृहात औचित्याचा मुद्दा सुरू असताना पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपूर स्मार्ट सिटीचे सीईओ तुकाराम मुंडे असताना २० कोटींच्या कामांना नियमबाह्य मंजुरी दिली. इतकेच नव्हे तर महिला अधिकाऱ्याला टॉर्चिंग केले. या दोन्ही प्रकरणाचे एफआयआर पोलिसांत दाखल आहे़ यावरून सभागृहात मुद्दा उचूला नका म्हणून मुंडेंच्या इशाऱ्यावरून धमकीचे फोन येतात़ याबाबत आपण मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, पोलीस आयुक्त व सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे़ हा गंभीर प्रकार असून आपल्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी केली. याच मुद्याला पुढे नेत आमदार प्रवीण दटके यांनी मुंडेंनी प्रसूत होऊन पाच दिवस झालेल्या महिलेला सुटी नाकारली. त्यात बेकायदेशीर कामे क्षमापित करण्यासाठी मंत्रालयाच्या भागवत नावाच्या कक्ष अधिकाऱ्याने पत्र काढले़ कृष्णा खोपडे हे चार टर्मचे आमदार आहे़ त्यांना धमकी देण्यात येते. दोषींना तत्काळ अटक करण्यात यावी. अशा अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी. यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खोपडे यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले आहे़ चौकशी होईल. न्याय मिळेल, असे उत्तर दिले. मात्र, त्यावर आमदार खोपडे, आमदार प्रवीण दटके यांचे समाधान झाले नाही. त्यांच्यासोबत हिंगण्याचे आमदार समीर मेघे, तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले व इतरांनी अध्यक्षांच्या आसनाकडे कुच केली. घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी लावून धरली. त्यानंतर अध्यक्षांनी दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले.