चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी या नेत्याचा सकाळी ब्रेकफास्ट

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी या नेत्याचा सकाळी ब्रेकफास्ट
-उपराजधानीत बॅक टू पॅव्हिलियनची चर्चा

प्रतिनिधी
नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूर येथे भेट घेतली आहे. यावेळी ब्रेकफास्ट करण्यासाठी आपण याठिकाणी आलो होतो या भेटीत कोणत्याही राजकीय चर्चा झालेल्या नाही, अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी दिली.

आशिष देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतची राजकीय भेट नाकारली आहे. मात्र सातत्याने राहुल गांधी, नाना पटोले यांच्यावर टीका करणाऱ्या देशमुखांच्या भाजप प्रदेशाध्यक्षांसोबतच्या या भेटीच्या चांगल्याच चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे बोलले जात होते मात्र चंद्रशेखर बावनकुळेंसोबतच्या या भेटीमुळे ते भाजपच्या वाटेवर तर नाहीना असे बोलले जात आहे.

आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महिन्याला एक खोका मिळतो असा गंभीर आरोप केला होता. याशिवाय मी माफी मागायला राहुल गांधी नाही असेही वक्तव्य त्यांनी केले होते.

आशिष देशमुख यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आशिष देशमुख म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे हे माझ्याबरोबर आमदार होते, मंत्री होते. ते त्यावेळचे आमचे उर्जावान उर्जामंत्री होते. याशिवाय पालकमंत्री म्हणून त्यांनी नागपूरसाठी जे काम केले ते नक्कीच उल्लेखनीय होते. आज त्यांनी मला त्यांच्या निवासस्थानी नाश्त्यासाठी बोलावले आहे. त्यासाठी मी येथे आलो आहे.

आशिष देशमुख पुढे बोलताना म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असले तरी आमचे अतिशय जिवलग मित्रही आहेत. ते विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात असल्याने त्याअनुषंगाने आमचे काही कामे नक्कीच असतात. त्यासाठी मी याठिकाणी आल्याचे देशमुख यांनी सांगितले.

आशिष देशमुख म्हणाले, माध्यमांनी राजकीय अर्थ काढण्याची काही गरज नाही. चहा-नाश्ता याचा आस्वाद घ्यावा. त्याशिवाय त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून मी त्यांच्याकडे आलो. भाजपाच्या नागपूर ग्रामीणच्या बैठकीचा माझ्या भेटीशी संबंध नाही

आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या सभेनंतर नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. आशिष देशमुख म्हणाले, नाना पटोले हे महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल करण्यासाठी खोडा घालत आहेत. नागपूरमध्ये 16 एप्रिलला मविआची वज्रमूठ सभा होत असताना नाना पटोले सांगतात की, 21 ते 25 एप्रिलदरम्यान राहुल गांधींची नागपूरमध्ये सभा होणार आहे. राहुल गांधींची 16 एप्रिलऐवजी वेगळी वेळ मागणे हे नाना पटोलेंच्या वेगळी चूल मांडण्याचे संकेत असल्याचा दावा देशमुख यांनी केला होता.