कोण म्हणाले चंद्रपुरात ? ही नफरत आणि जुमल्याची गॅरंटी
-दहा वर्षांत एकही काम पूर्ण नाही.
प्रतिनिधी
चंद्रपूर : देशातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात एकही काम, आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, विदेशातील काळा पैसा परत आणू, अर्थव्यवस्था हे सर्व जैसे थे आहे. या सर्व आश्वासनांचे काय झाले यावर कुणी प्रश्र्न विचारू नये म्हणून अब की बार ४०० पार हा नवीन जुमला मोदींनी आणला आहे. या जुमल्याचेच मोदी गॅरंटी असे नामकरण केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकीकडे मोदींची नफरत व विभाजनाची भाषा आहे तर दुसरीकडे महात्मा गांधी यांची प्रेमाची भाषा आहे. या लढाईत देशातील १४० कोटी जनता गांधींच्या प्रेमाच्या भाषेला विजयी करेल असे मत काँग्रेसचे कन्हैयाकुमार यांनी व्यक्त केले.
येथील न्यु इंग्लिश स्कूल हायस्कूलचे क्रीडांगणावर इंडिया व महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते. मंचावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर, एन. एस. यू.आय. अध्यक्ष आमिर शेख उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना कन्हैयाकुमार यांनी मोदी सरकारवर टिका केली. मी महाराष्ट्रात लढण्याची हिम्मत घेण्यासाठी नियमित येत असतो. हा लढणाऱ्यांचा प्रदेश आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर या रडून नाही तर विरोधकांशी लढून जिंकणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना अनेक आश्वासने दिली होती. वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही. अशी असंख्य आश्वासने मोदी यांनी दिली. मात्र त्यापैकी एकही पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. शेतकऱ्यांना एमएसपी मिळाला नाही. मतदारांना दिलेल्या आश्वासनांपैकी एकही गोष्ट पूर्ण झाली नाही. पंतप्रधानांकडे बोलण्यासाठी आता काहीच उरले नाही. त्यामुळेच अब की बार ४०० पारचा नारा देवून मतदारांना भ्रमीत केले जात आहे. ज्या व्यक्तीने जीवनसाथी सोबत धोका केला तोच व्यक्ती अशा प्रकारे खोटं बोलू शकतो असेही कन्हैयाकुमार म्हणाले. एक अकेला सबको भारी असे म्हणायचे. महाराष्ट्रात मोदींनी उध्दव ठाकरे यांची शिवसेना तोडली व एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली व भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अजित पवार यांना सोबत घेतले. काँग्रेसचे निवडणूक हरणारे नेते अशोक चव्हाण , मिलिंद देवरा यांना सोबत घेतले. आता त्यांनी राज ठाकरे यांना महायुतीत आणले आहे.


