कोण आहे ते ? काकांच्या गटाचा आणखी एक नेता दादांच्या गळाला
-मंत्रिपदाची लागेल लॉटरी
प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा आणखी एक मोठा नेता अजित पवार यांच्या गळाला लागल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा नेता शरद पवार यांच्या जवळचा आहे. तो लवकरच अजित पवार यांच्या गटात सामील होईल. त्यानंतर आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्याला मंत्रिपदाची लॉटरीही लागेल.
अजित पवार यांनी गत 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी बडे चेहरेही गेले. त्यानंतर अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर भुजबळ, मुंडे, वळसे व मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या गटातील आणखी एक नेता अजित पवारांच्या गळा लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना तुमचे आमच्याकडे लक्षच नसल्याचा टोला हाणला होता. तेव्हापासून राज्यात शरद पवार यांचा आणखी एक मोहरा अजित पवार यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे शरद पवार यांना आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सू्त्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याने अधिवेशन काळात भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्याने संभाव्य घडामोडींवर विस्तृत चर्चा केली. हा नेता अजित पवारांच्या गटात गेल्यानंतर त्याला पुढील मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली जाईल.
उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व अजित पवार या प्रकरणी या दौऱ्यात त्यांच्याशी चर्चा केली. यात मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा प्रमुख अजेंडा असेल, अशी माहिती आहे.
पक्षातील बडे नेते साथ सोडून जात असताना शरद पवार यांनी मात्र आपण महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राज्यभर दौरे करून पक्ष संघटना पुन्हा उभी करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. पक्षात यापुढे तरुणांना अधिकाधिक संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.


