काय बोलता? या राज्यातील भाजपा सरकार सापडले संकटात
-युतीतील पक्ष पाठिंबा काढण्याच्या तयारीत
प्रतिनिधी
त्रिपुरा : ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यातील भाजपा सरकार संकटात आले आहे. त्रिपुरातील सत्ताधारी आघाडीत भाजपा, टिप्रा मोथा आणि इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा यांचा समावेश आहे. मात्र, या मित्रपक्षांमध्ये सगळे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही आठवड्यांपासून भाजपा आणि टिप्रा मोथाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाच्या बातम्या समोर येत आहेत. २०२३ च्या विधानसभा निवडणुकांनंतर एकत्र आलेले भाजपा आणि टिप्रा मोथा यांच्यात सध्या मतभेद निर्माण झाल्याचे दिसत आहे.
गेल्या महिन्यात खोवई जिल्ह्यातील आसरमबारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकणाऱ्या भाजपा समर्थकांवर हल्ला झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी सेपाहिजाला जिल्ह्यात एका भाजपा कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर मुख्यमंत्री माणिक साहा यांनी टिप्रा मोथावर हिंसक हल्ल्याचा आरोप केला. त्यांनी असे प्रकार सहन केले जाणार नाहीत असा इशारा दिला आणि पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
प्रद्योत बिक्रम माणिक्य देब बर्मा यांनी २०२१ मध्ये ‘ग्रेटर टिपरा लँड’च्या मागणीसह टिप्रा मोथाची स्थापना केली होती. स्थापनेनंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांनी त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषदच्या निवडणुका जिंकल्या आणि दोन वर्षांनंतर हा राज्याच्या विधानसभेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला. त्यांनी सुरुवातीला भाजपाच्या विरोधात प्रचार केला. मात्र, त्यांना आदिवासींच्या सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक आणि जमिनीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारबरोबर त्रिपक्षीय करार करून त्यांनी सत्ताधारी आघाडीत प्रवेश केला.


