काय बोलता ? उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात भाजपाचा हा बडा मिनिस्टर उभा
-आगामी निवडणुकांसाठी भाजपाची रणनीती
प्रतिनिधी
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यासाठी भाजपाने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. ठाण्यासह मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) सात महापालिकांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती लक्षवेधी ठरत आहे. याचे कारण म्हणजे गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जातात.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे समर्थक आणि गणेश नाईक यांच्या समर्थकांमधील वक्तव्यांमुळे त्यांच्यातील संबंध अधिक ताणले गेल्याचे पाहायला मिळत आहे. हा निर्णय म्हणजे आगामी महापालिका निवडणूकांमध्ये ठाणे जिल्ह्यात भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्रमक पाऊल उचलल्याचे संकेत मानला जात आहे. भाजपाने गणेश नाईक यांची नियुक्ती का केली? भाजपासाठी ते किती महत्त्वाचे? आगामी निवडणुकांसाठी भाजपाची रणनीती काय?

एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यासाठी भाजपाने महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. शिंदे यांचे जुने प्रतिस्पर्धी असलेले नाईक यांची नियुक्ती ‘महायुती’मधील भागीदार असलेल्या भाजपा आणि शिवसेनेमधील नवीन संघर्षाची ठिणगी मानली जात आहे. या दोन पक्षांमधील नाजूक समीकरणामुळेच गेल्या तीन वर्षांपासून प्रादेशिक राजकारणाला आकार मिळाला आहे. गणेश नाईक यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद घेत पक्षातून फारकत घेतली होती. त्यांनी ठाण्यामध्ये पक्षाविरोधात आपली भूमिका कायम ठेवली होती.


