काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी का घेतली केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट ?

काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी का घेतली केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट ?

-राजकीय वर्तुळात विविध चर्चा

प्रतिनिधी
नागपूर : केद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात भूमिका घेणे विरोधी पक्षातील नेते टाळतात. टीका केली तरी तरी राजकीय स्वरूपाची असते, ती व्यक्तिगत नसते. कारण गडकरी यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत असलेले सौहार्दाचे संबध. ते ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या रस्ते व महामार्ग खात्याच्या माध्यमातून गडकरी पक्षभेद न पाळता प्रत्येकाला निधी देतात.

रस्ते, महामार्ग सर्वांना हवे असतात. त्यामुळे सर्वांशी त्यांची मैत्री घट्ट. पण त्यांच्याच नागपुरातील कॉंग्रेसचा एक आमदार त्यांना थेट भिडतो. त्यांच्या प्रकल्पाला जाहीर विरोध करतो. त्यांचे नाव आहे विकास ठाकरे. लोकसभा निवडणुकीतही ठाकरे विरुद्ध गडकरी लढत रंगली होती. तेच ठाकरे शनिवारी गडकरी यांना त्याच्या घरी जाऊन भेटले. निमित्त होते उत्तराखंडच्या रस्त्याचे. राजकारणात जे दिसते त्यावर विश्वास ठेवायचा नसतो, पडद्या आड काय घडते हे महत्वाचे असते. ठाकरे यांनी गडकरींची भेट घेणे याला त्यामुळेच राजकीय वर्तुळात महत्व आहे.

गडकरी कट्टर भाजपचे तर ठाकरे कट्टर काँग्रेसचे, दोघांचेही पक्षांतर्गत विरोधक अधिक आणि इतर पक्षात मित्र भरपूर. गडकरी राष्ट्रीय राजकारणातील खेळाडू तर ठाकरे काँग्रेसचे स्थानिक नेते. त्यामुळे या दोघांचे राजकीय वैर तसे नव्हते. पण २०१४ मध्ये गडकरींनी नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे ठऱवले आणि तेथून या दोन नेत्यांमधील राजकीय संघर्ष सुरू झाला.कारण ठाकरेंचे राजकीय गुरू विलास मुत्तेमवार हे या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. ठाकरेंनी मुत्तेमवार यांच्यासाठी सर्वप्रतिष्ठा पणाला लावली तर गडकरी प्रथमच लोकसभा निवडणूक लढत होतो. त्यामुळे सर्व ताकद त्यांनी झोकून दिली होती.काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीचा फायदा उचलत गडकरी यांनी मुत्तेमवार यांचा पराभव करीत दिल्ली गाठली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

दुसरीकडे २०१४ नंतर नागपूर शहरात भाजपच्या ‘आरे ला कारेने ’उत्तर देण्याची तागद निर्माण करून ठाकरे यांनी काँग्रेसला जीवंत ठेवले. एकीकडे भाजपला विरोध करताना ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी जुळवून घेतले. २०१९ मध्ये ते आमदार झाले. पण गडकरींशी त्यांचे पटले नाही. मेट्रो प्रकल्प असो, मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांचा भ्रष्टाचार असो किंवा नागपुरात एक लाख कोटींची विकास कामे केल्याचा गडकरींचा दावा असो या सर्व मुद्यांवर ठाकरे यांनी गडकरींवर थेट आरोप केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कर गडकरींनी नागपुरात बांधलेले उड्डाण पुल असो की सिमेट रस्ते कसे निरर्थक ठरले, शहराचा सत्यानाश त्यांनी केला, असे गंभीर आरोप ठाकरे यांनी केले होते.