करुणा मुंडे कोर्टात : आता धनंजय मुंडे यांच्यावर ही टांगती तलवार

करुणा मुंडे कोर्टात : आता धनंजय मुंडे यांच्यावर ही टांगती तलवार

-प्रकरण न्यायालयात

प्रतिनिधी
बीड : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. संतोष देशमुख हत्याकांडाचे अत्यंत संतापजनक फोटो आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे सर्वच जण हादरले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठ्या घडामोडी घडल्या आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलं. मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. करुणा शर्मा यांनीही या प्रकरणावर काल प्रतिक्रिया दिल्यानंतर आज पुन्हा एकदा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

करुणा शर्मा यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. 2014 आणि 2019मध्ये धनंजय मुंडे एमएलसी होते. त्यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात माझे आणि माझ्या मुलाचे नाव लपविले होते. आता मला सगळं समजलं आहे. त्यामुळे मी कोर्टात गेली आहे. धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यासाठी मी न्यायालयीन लढाई लढत आहे, असं करुणा शर्मा म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सहआरोपी करणं इतकं साधंसोपं नाही. कायदा आहे. त्यात काही हस्तक्षेप करता येत नाही. शासकीय निवासस्थानात खंडणीसाठी बैठक झाली होती. त्याची चौकशी झाली पाहिजे. चौकशीत मुंडे दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. तर त्याांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलं आहे. गुंडगिरी करून मुंडे यांनी निवडणुका जिंकल्या होत्या. त्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्याचा अधिकार नव्हता. तरीही त्यांना शपथ देण्यात आली होती, असा हल्लाच त्यांनी चढवला.

धनंजय मुंडे यांच्या जीवावर पंकजा मुंडे मंत्री झाल्या. आज तुम्ही तोंड उघडत आहात. तीन महिने कशाला गप होता? संतोष देशमुख यांच्या घरी तुम्ही जायला हवं होतं. आता तुम्ही समोर येऊन ॲक्टींग करतायेत. हो दोन्ही बहीण भाऊ नाटकात हवे होते, अशी टीका त्यांनी केली.

चार्जशीटमध्ये वाल्मीक कराडला वाचवण्याच्या प्रयत्न करत आहे. बाप तो बाप रहेगा हे हे लोकांचं म्हणणं आहे. बाप जो आहे तो वाल्मीक कराड आहे आणि सुदर्शन घुले हा बालक आहे. त्याचं वय पण 26 वर्ष आहे.. त्याच्यामुळे वाल्मीक कराड आणि जे मुख्य सूत्रधार आहे, त्यांना मुख्य आरोपी केलं पाहिजे, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.