ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा बडा नेता जाणार काँग्रेस पक्षात

ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा बडा नेता जाणार काँग्रेस पक्षात

-म्हणे, भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी आपण प्रवेश करतोय

प्रतिनिधी
गुजरात : भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास तयार असल्याची माहिती गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी द इंडियन एक्स्प्रेसला मंगळवारी दिली. सध्या राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांबरोबर माझी चर्चा सुरू असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतरच माझा काँग्रेसमधील प्रवेशाबाबतचा अंतिम निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गांधीनगर महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसमध्ये परतण्याचे संकेत दिल्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

त्याचबरोबर २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्या या भूमिकेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. २०१७ मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर शंकरसिंह वाघेला यांनी जनविकल्प पक्षाची स्थापना केली होती. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर राजकीय आघाडी केली. त्यानंतरच्या एका वर्षातच वाघेला यांना प्रजा शक्ती डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना केली. आता मात्र त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेसकडून मला कोणतीही अपेक्षा नसून फक्त पक्षासाठी मनापासून योगदान देण्याची इच्छा आहे, असे आपण काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला सांगितल्याचे वाघेला यांनी स्पष्ट केले. २०२७ मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत राजकीय प्रभाव पाडण्याची माझ्याकडे शेवटची संधी आहे. त्याकरिता प्रजा शक्ती डेमोक्रॅटिक पार्टी पुन्हा सक्रिय करण्यासाठी येत्या २ ऑक्टोबरपासून मी आक्रमक अभियान सुरू करणार आहे. भाजपाविरोधातील लढ्यात मला माझे योगदान द्यायचे आहे. ही विधानसभा निवडणूक माझी शेवटची संधी आहे. यानंतर मी इतका सक्रिय राहू शकेन असे वाटत नाही, असे वाघेला यांनी याच महिन्याच्या सुरुवातीला द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले होते.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी आपण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच त्यावेळचे गुजरातचे प्रभारी असलेले मुकुल वासनिक यांच्याशीही संपर्क साधला होता; पण त्यांच्याकडून पक्षप्रवेशाबाबतचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या महिन्याच्या सुरुवातीला सुरजेवाला यांची गुजरातचे नवे प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून लवकरच आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वाघेला यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. यादरम्यान ८६ वर्षीय ज्येष्ठ नेते काँग्रेसमध्ये परतल्यास पक्षाला नेमका किती फायदा होईल, यावरून राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्येच मतभेद असल्याचे दिसून येते. मंगळवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसने २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे सांगितले. आगामी काळात अनेक नाराज नेते आमच्या पक्षात प्रवेश करून राज्यातील सत्तापरिवर्तनासाठी एकजुटीने काम करतील, असा दावाही त्यांनी केला. दुसरीकडे- काँग्रेसमधील एका गटात अद्याप वाघेला यांच्या भूमिकेविषयी साशंकता आहे. विशेषतः २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडण्यामागील परिस्थितीमुळे पक्षातील काही नेते सावध असल्याचे दिसून येत आहे.

२०१७ मध्ये शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली होती. त्याआधी चुरशीच्या ठरलेल्या राज्यसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांचे तत्कालीन राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचा निसटता विजय झाला होता. तसेच त्याच महिन्यात झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जवळपास आठ आमदारांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात मतदान केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतरच्या अवघ्या चार दिवसांतच तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेल्या वाघेला यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता. त्यांनी पक्ष सोडल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने हार्दिक पटेल यांच्या पाटीदार आरक्षण आंदोलनाच्या जोरावर १८२ पैकी ७७ जागा जिंकल्या होत्या. १९९५ नंतर राज्यात काँग्रेसला मिळालेले हे सर्वाधिक यश होते. त्यानंतर मात्र पक्षाची कामगिरी सातत्याने घटत गेली. सध्या विधानसभेत काँग्रेसचे केवळ १२ आमदार असून त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतकेही संख्याबळ नाही.

-गुजरातमधील काँग्रेसची सद्यस्थिती

२०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला गुजरातमध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. २०२४ मध्ये पक्षाला फक्त बनासकांठा या एकाच जागेवर विजय मिळवता आला. दरम्यान, अहमद पटेल यांच्या निधनानंतर २०२१ मध्ये वाघेला यांनी काँग्रेसमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या निकटवर्तीयांच्या मते, राज्यातील ज्येष्ठ नेत्याच्या निधनानंतर काँग्रेस आपल्याकडे ‘मार्गदर्शक आणि रणनीतीकार’ म्हणून पाहील आणि पक्षात पुन्हा घेईल, अशी आशा वाघेला यांना होती. पण, तसे घडले नाही. आता मात्र वाघेला यांनी काँग्रेस सोडली तेव्हा प्रदेशाध्यक्ष असलेले भरतसिंह सोलंकी हेच त्यांच्या घरवापसीसाठी पुढाकार घेताना दिसून येत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून मी त्यांना काँग्रेसमध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. विरोधातील सर्व नेत्यांना एकजूट करून गुजरातमध्ये भाजपाचा पराभव करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे सोलंकी यांनी मंगळवारी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

–असा आहे शंकरसिंह वाघेला यांचा प्रवास
शंकरसिंह वाघेला यांचा काँग्रेसशी संबंध १९९० च्या दशकापासून आहे. १९९६ मध्ये भाजपापासून फारकत घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता पक्षाची (RJP) स्थापना केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्यांनी गुजरातमध्ये सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. हे सरकार स्थापन करण्यासाठी युती घडवून आणण्यात अहमद पटेल यांनी मदत केल्याचे वाघेला यांनी अनेकदा सार्वजनिकपणे सांगितले आहे. पुढे राष्ट्रीय जनता पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन झाला. गोध्रा दंगलीनंतर झालेल्या २००२ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने वाघेला यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषवले होते. आता ते काँग्रेसमध्ये पुन्हा परतल्यास गुजरातमध्ये भाजपासमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.