उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले पंतप्रधानांचे कौतुक : हे ठरले कारण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले पंतप्रधानांचे कौतुक : हे ठरले कारण

-वाढवण बंदर येथे चौथी मुंबई

प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करण्यात आलं, तर मोदी हात लावतात तिथे सोनं होतं, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानांचं तोंडभरून कौतुक केलं. ‘नवी मुंबईत तिसरी आणि वाढवण बंदर येथे चौथी मुंबई होईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठ्यांविरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या विकासकामांचा पाढाच वाचून दाखवला. “हवाई चप्पल घालणारा सामान्य माणूसही हवाई प्रवास करू शकेल असे माझे स्वप्न आहे. त्यासाठी १० वर्षांत केंद्र सरकारने अनेक विमानतळांना परवानग्या दिल्या आहेत. २०१४ साली देशात ७४ विमानतळ होते आणि आता त्याची संख्या १६० झाली आहे”, असे मोदी म्हणाले.

मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन मीच केले होते, पण त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ते काम थांबवले. त्यामुळेच मुंबईकरांना असुविधा झाली. मात्र, आता मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. एका एका मिनिटाचे महत्त्व असलेल्या मुंबईकरांना या प्रकल्पासाठी पाच वर्ष वाट पाहावी लागली. हे कोणत्याही पापापेक्षा कमी नाही”, अशी टीकाही मोदींनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केली.