आव्हाड व्यथित: दिला आमदारकीचा राजीनामा

आव्हाड व्यथित: दिला आमदारकीचा राजीनामा

-मंजुरीचा निर्णय पवारांच्या कोर्टात

प्रतिनिधी

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपविला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून राजीनाम्यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

भाजपच्या पदाधिकारी महिलेच्या तक्रारीवरून आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. आव्हाडांनी राजीनामा देऊ नये, यासाठी त्यांची समजूत घालण्यासाठी जयंत पाटील आज मुंबईला आले. मात्र, आपण राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.

-बुद्धी गहाण ठेवून कारवाई

जयंत पाटील म्हणाले, पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर केला जात आहे. पोलिस बुद्धी गहाण ठेवून विरोधकांवर कारवाई करत आहे. पोलिसांचा असाच गैरवापर होत राहिला तर सामान्यांचा पोलिसांवरील विश्वास उठेल. जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, अशी आमची भूमिका आहे. यासंदर्भात शरद पवारांशी चर्चा करून निर्णय घेऊ.