आता दोन्ही राष्ट्रवादी झाल्या एकत्र : पुढील राजकारणाचा हा असेल टप्पा

आता दोन्ही राष्ट्रवादी झाल्या एकत्र : पुढील राजकारणाचा हा असेल टप्पा

-स्थानिक राजकारणाने जुळताहेत कुटुंब

प्रतिनिधी
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणाची समीकरणे बदलू लागली आहेत. उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शरद पवार – अजित पवार हे काका- पुतणे एकत्र आले आहेत. याप्रमाणेच काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची हातमिळवणी झाली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला. त्यापाठोपाठ पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील अशी घोषणा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. यामुळे पवार काका- पुतणे एकत्र येणार ही चर्चा अखेर प्रत्यक्षात आली आहे. नगरपालिका निवडणुकीत धुव्वा उडाल्यावर शरद पवार गटासमोर अन्य पर्याय नव्हता. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने स्वतंत्र लढण्याचे जाहीर केल्यावर अजित पवारांना स्वत:च्या अस्तित्वासाठी काकांबरोबर जुळवून घ्यावे लागले आहे. पवार काका – पुतणे एकत्र आल्याने राष्ट्रवादीतील एक अध्याय अखेर पूर्ण झाला.

शिवसेना व मनसेने एकत्र लढण्याचे जाहीर केले आहे. तशी घोषणा उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. मुंबई, ठाण्यासह अन्य काही महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत. उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू जवळपास दोन दशकांनंतर एकत्र आले आहेत.
ठाकरे बंधू, पवार काका- पुतण्याप्रमाणेच काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत एकत्र लढण्याचा घेतलेला निर्णय हा महत्त्वाचा आहे. काँग्रेस आणि वंचित जवळपास २५ वर्षानंतर एकत्र आले आहेत.

ठाकरे बंधू, पवार काका–पुतणे, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र लढत असल्याने राज्याच्या राजकारणातील एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे मानले जाते. भाजपच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी या विविध आघाड्या वा युत्या झाल्या आहेत. अजित पवार हे भाजपप्रणित महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना ते भाजपच्याच विरोधात लढत असल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते. एकाच वेळी भाजप आणि महाविकास आघाडीतील शरद पवार गट असा दोन्ही डगरींवर अजित पवारांनी पाय ठेवला आहे.

पवार काका – पुतणे एकत्र येण्याची ही सुरुवात आहे का, अशी चर्चा एव्हाना सुरू झाली आहे. विधानसभा तसेच नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीतही शरद पवार गट निष्प्रभ ठरला. महानगरपालिका निवडणुकीतही शरद पवार गटाला फार काही आशादायी चित्र दिसत नाही. यातूनच पवारांच्या पक्षाने अजित पवारांशी जुळवून घेतले आहे. याचा फायदा काका – पुतण्यापैकी कोणाला होतो हे आता बघायचे.

-या नेत्यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली
काँग्रेसनेही प्रकाश आंबेडकर यांच्याशी जुळवून घेत त्यांना अधिक महत्त्व दिले आहे. वंचितसााठी मुंबईत ६२ जागा सोडण्यात आल्याने त्याची पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ठाकरे बंधू किंवा पवार काका – पुतण्यांच्या पक्षांची मते परस्परांकडे हस्तांतरित होण्यात फारशी अडचण येणार नाही. कारण अजित पवार किंवा राज ठाकरे हे मुळ पक्षापासून दूर होत त्यांनी स्वतंत्र पक्ष काढले होते. काँग्रेस आणि वंचितमध्येच मतांचे हस्तांतरण कसे होते याबाबत साशंकता घेतली जाते.