अमरावतीत मतमोजणीला ३४ तास, अखेर हे उमेदवार विजयी
-रणजित पाटलांना अतिआत्मविश्वास नडला
अमन कठाणे
अमरावती : विधानपरिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना ३४ तासानंतर अखेर विजयी घोषित करण्यात आले. कोटा पूर्ण झाला नसला तरी सर्वाधिक मते प्राप्त झाल्याच्या आधारावर त्यांनी विजयाचा मार्ग सुकर केला. मतदारांनी दिलेला प्रथम पसंतीक्रम हा निर्धारित मतांएवढा (कोटा) नसल्याने धीरज लिंगाडे व त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. रणजीत पाटील वगळता इतर सर्व २१ उमेदवारांच्या मतपत्रिकेतील दुसरी पसंती तपासण्यात आली. या पसंती अखेर लिंगाडे यांना ४६ हजार ३४४ तर डॉ. पाटील यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली होती. कोटा ४७ हजार १०१ मतांचा होता. त्यामुळे लिंगाडे यांना आणखी ७५७ मते हवी होती. परंतु दुसरी पसंती तपासण्यासाठी आता कोणताही उमेदवार शिल्लक नसल्याने सर्वाधिक मते प्राप्त करणारे उमेदवार म्हणून आयोगाने त्यांच्या विजयाची घोषणा करण्यास परवानगी दिली. या निवडणुकीत १ लाख २ हजार ५८७ मतदारांनी मतदान केले. त्यातील ८ हजार ३८७ मते अवैध घोषित करण्यात आली. उर्वरित ९४ हजार २०० मतांच्या आधारे ४७ हजार एक असा कोटा निश्चित करण्यात आला. लिंगाडे यांना पहिल्या पसंतीची ४३ हजार ५१७ तर डॉ. पाटील यांना ४१ हजार १७१ मते मिळाली होती. कोटा कुणीच पूर्ण न केल्याने इतरांच्या मतपत्रिकेतील दुसरी पसंती मोजणे क्रमप्राप्त झाले होते.
सायंकाळी चार वाजता केले विजयी घोषित या निवडणुकीची मतमोजणी तब्बल ३४ तास चालली. प्रथम पसंतीची मते जाणून घ्यायलाच पहिले १४ तास खर्च झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने २१ उमेदवारांच्या मतपत्रिकेतील दुसरा पसंतीक्रम जाणून घेण्यात आला. अशाप्रकारे गुरुवारी सकाळी ६ वाजता सुरु झालेली मतमोजणी आज, शुक्रवारी दुपारी अडीच वाजता पूर्ण झाली. त्यानंतरचा दीड तास हा आयोगाकडून मान्यता घेण्यासाठी द्यावा लागला. त्यामुळे दुपारी ४ च्या सुमारास लिंगाडे यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले.


