२०२७ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे ठरले : प्रियांका गांधी असणार चेहरा

२०२७ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे ठरले : प्रियांका गांधी असणार चेहरा

-पक्ष पातळीवर संपूर्ण नियोजन ठरले

प्रतिनिधी
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. २०१९ मध्ये प्रियांका गांधी वाड्रा यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (एआयसीसी) सरचिटणीसपदी आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीने राज्यातील काँग्रेस नेत्यांना अशी आशा होती की त्यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशामुळे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या संघटनेत नवचैतन्य निर्माण होईल. पण, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आणि पक्षाची संख्या केवळ दोन जागांवर मर्यादित राहिली.

त्यानंतर प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये सक्रीय नव्हत्या. २०२३ च्या अखेरीस त्या उत्तर प्रदेशातून पूर्णपणे बाजूला झाल्या होत्या. मात्र आता दोन वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात पुन्हा सक्रीय होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता २०२७ ची निवडणूक काँग्रेस राहुल गांधी नव्हे, तर प्रियांका गांधी यांच्या चेहऱ्यावर लढवेल अशी चर्चा आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसची रणनीती काय? समजून घेऊयात…

उत्तर प्रदेशमध्ये जनसंपर्क मोहीम

दोन वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर, प्रियांका गांधी वाढदिवसानिमित्त (सोमवार, १२ जानेवारी) आता उत्तर प्रदेश काँग्रेस १०० दिवसांच्या जनसंपर्क मोहिमेची घोषणा करणार आहे. त्याचबरोबर, पक्षाचा इतर मागासवर्गीय (ओबीसी) विभाग ‘सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर’ प्रकाश टाकण्यासाठी ‘परिवर्तन प्रतिज्ञा’ मोहीम सुरू करणार आहे. पक्षाच्या कारभारात प्रियांका गांधींची भूमिका पुन्हा एकदा महत्त्वाची ठरत असल्याचे दिसून येत आहे.

शनिवारी (१० जानेवारी) सुरू झालेल्या काँग्रेसच्या ‘मनरेगा बचाव अभियाना’च्या त्या मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जात आहे. तसेच, संसदेत ‘वंदे मातरम’ चर्चेदरम्यान त्यांच्या भाषणानेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामुळे त्यांच्याबद्दलची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेतृत्वाला असा संकेत देत आहे की, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रियांका गांधींची भूमिका अत्यंत सक्रिय आणि निर्णायक असेल.

१०० दिवसांचा राजकीय कृती आराखडा जाहीर

शनिवारी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी २० जिल्हा आणि शहर घटकांना परिपत्रक जारी केले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, विद्यमान आणि माजी खासदार-आमदारांसह काँग्रेसचे वरिष्ठ नेते आपापल्या भागात पक्षाचा १०० दिवसांचा राजकीय कृती आराखडा जाहीर करतील. यामध्ये सहारनपूरमधील इम्रान मसूद, प्रयागराजमधील उज्ज्वल रमण सिंह, देवीपाटणमधील तनुज पुनिया आणि मेरठमधील राजीव शुक्ला यांसारख्या विद्यमान खासदारांसह आझमगडमधील आमदार वीरेंद्र चौधरी, अयोध्येतील माजी खासदार निर्मल खत्री आणि गाझियाबादमधील माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद व चित्रकुटमधील प्रदीप जैन आदित्य यांचा समावेश आहे.

संविधान संवाद महापंचायत’ होणार

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात ‘संविधान संवाद महापंचायत’ म्हणजेच संविधानावर आधारित जाहीर सभा आणि भाजपाशासित राज्य व केंद्र सरकारविरोधात रॅली काढण्यात येणार आहेत. ही मोहीम संविधानिक आणि लोकशाही हक्कांवर लक्ष केंद्रित करेल. यामध्ये निवडणूक आयोगाकडून निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये सुरू असलेली एसआयआर मोहीम आणि ‘मनरेगा’ ग्रामीण रोजगार हमी कायद्यात करण्यात आलेले बदल यांसारख्या विषयांचा समावेश असेल.

परिवर्तन प्रतिज्ञा’ मोहिमेने सुरुवात

तसेच, ‘नुक्कड’ (कोपरा) सभा आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून स्थानिक प्रश्नांवर जनतेपर्यंत पोहोचण्याचे पक्षाचे नियोजन आहे. काँग्रेस नेत्यांनी या मोहिमांच्या सांगतेसाठी मोठ्या सभांचेही नियोजन केले आहे. ‘संविधान संवाद महापंचायत’चा समारोप लखनऊमधील एका भव्य सभेने होईल. प्रियांका गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर ‘परिवर्तन प्रतिज्ञा’ मोहिमेचा समारोप २०२७ च्या सुरुवातीला एका सभेने होईल.

निवडणुकीच्या दृष्टीने ही मोठी मोहीम

एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “बऱ्याच काळानंतर पक्ष राज्यात अशा प्रकारची नियोजनबद्ध जनसंपर्क मोहीम राबवत आहे. गेली वर्षभर पक्ष संघटना बांधणीच्या कामात व्यस्त होता. आम्ही प्रियांका गांधींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १०० दिवसांचा कृती आराखडा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये महापंचायत, संमेलने आणि ‘कोपरा’ सभांचा समावेश असेल. आमचे ‘संघटन सृजन अभियान’ जवळपास पूर्ण झाले आहे, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही आमची पहिली मोठी मोहीम असेल.

उत्तर प्रदेशमधील त्यांच्या मागील कार्यकाळात, प्रियांका गांधी या पक्षाचा एक आक्रमक चेहरा होत्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर त्यांच्या कथित अपयशावरून त्यांनी जोरदार टीका केली होती. २०२१ मध्ये त्यांनी ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ ही मोहीम सुरू केली होती. लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर भाजपाविरोधात आंदोलनांचे नेतृत्व केले होते. तेव्हा त्या मैदानावर उतरून पक्षाचे नेतृत्व करण्यास सज्ज असल्याचे मानले जात होते.

मात्र, २०२२ मधील पराभवानंतर त्या दिसेनाशा झाल्या, दुसरीकडे पक्षाची संघटनात्मक स्थिती खालावली आणि पुन्हा उभे राहण्यासाठी पक्षाला संघर्ष करावा लागला. काँग्रेसच्या सूत्रांनुसार, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या चांगल्या कामगिरीचा फायदा घेत पक्ष आता २०२७ च्या लढाईसाठी सज्ज होत आहे आणि प्रियांका गांधी या प्रचाराचा मुख्य चेहरा असणार आहेत.