१५ पहिलवानांचे लैंगिक शोषण: बृजभूषण शरण सिंहवर आरोप

१५ पहिलवानांचे लैंगिक शोषण: बृजभूषण शरण सिंहवर आरोप

-अटकेसाठी कुस्तीपटू ठाम

प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय कुस्तीवर कलंक शुक्रवारी आणखी गडद झाला. कारण एफआयआरमधील तपशील आता उजेडात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार कुस्ती संघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर किमान १५ वेळा महिला पहिलवानांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. सहा पीडित महिला पहिलवानांनी एफआयआरमध्ये अयोग्य इराद्याने स्पर्श केल्याच्या दहा घटनांचा उल्लेख केला. विरोध करणाऱ्या महिला पहिलवानांना करिअर संपवण्याची धमकी देणे, पाठलाग करणे हेही आरोप आहेत. करिअरमध्ये प्रगतीसाठी मदतीच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याच्या मागणीचा आरोप दोन घटनांतून समोर आला. पहिलवानांचे आंदोलन सुरू होण्याच्या अनेक दिवसांनंतर दिल्ली पोलिसांनी २८ एप्रिलला एफआयआर दाखल केला.

एक पीडित पहिलवान किशोरवयीन सांगण्यात आली होती. तिच्या जबाबानुसार पॉक्सो अॅक्ट अंतर्गत खटला दाखल झाला. ‘बृजभूषणने फोटो काढण्याच्या बहाण्याने मला स्वत:कडे आेढले. खांद्याला दाबले. नंतर दोन्ही हातांनी शरीराच्या विविध भागांना स्पर्श केला. मी विरोध केला. हे चाळे बंद करावे, असे मी आधीही सांगितले.’, असे तिने जबाबात नमूद केले. शुक्रवारी कपिल देव, सुनील गावस्कर, मदनलालसह १९८३ च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या सर्व खेळाडूंनी संयुक्त वक्तव्य जाहीर केले. दिल्लीत धरणे धरणाऱ्या पैलवानांना दिलेल्या वागणुकीवरून दु:ख झाल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली.

-सर्व घटना २०१२ ते २०२२

रेस्लर-1: श्वास तपासण्याच्या बहाण्याने ३-४ वेळा स्पर्श
मी रेस्तराँमध्ये होते. बृजभूषणही तेथे होते. त्यांनी मला जवळ बोलावले. तेथे गेल्यावर त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. असे तीन-चार वेळा केले. ते आपल्या पायांनी मला स्पर्श करत होते. मी विरोध केला तेव्हा श्वास तपासत अाहे, असे सांगू लागले. पुन्हा त्यांनी तसे चाळे केले.

रेस्लर-2 : आत जाताच दरवाजा बंद केला
सरावादरम्यान मी मॅटवर होते. बृजभूषण आले. माझे टी-शर्ट आेढले. नंतर स्पर्श केला. मी एका कामासाठी फेडरेशनच्या कार्यालयात गेले. सोबत माझे भाऊही होते. त्याने मला खोलीत बोलावले, भावांना बाहेर थांबायला लावले आणि दार बंद केले.

रेस्लर-3: करिअरमध्ये मदतीचे प्रलोभन
माझ्याकडे फाेन नव्हता. बृजभूषणने त्यांच्या फोनवरून आई-वडिलांशी बोलणे करून दिले. बृजभूषण आपल्या बेडवर होते. कॉल झाल्यानंतर जवळ बोलावले. मी विरोध केला. संबंधाच्या बदल्यात करिअरमध्ये मदतीचे प्रलोभन दिल्याचा आरोप केला गेला.

रेस्लर-4 : भोजनासाठी महिला पहिलवानांना ग्रुपनेच जावे लागे
बृजभूषण छेडछाडीची संधी शोधत असत. त्यांची दहशत होती. आम्ही हॉटेलच्या खोलीतून एकट्या बाहेर पडू शकत नव्हतो. ब्रेकफास्ट, लंच, डिनरसाठी ग्रुपने जात होतो. एकदा बृजभूषणने मला बोलावले. हाताने स्पर्श केला. मी तेथून निघून गेले.

रेस्लर-५ : फोटोच्या बहाण्याने शरीरस्पर्श
आम्ही फोटो काढण्यासाठी रांगेत उभे होतो. मी शेवटच्या रांगेत होते. बृजभूषण माझ्याजवळ उभे राहिले. मग त्यांनी माझ्या शरीराला स्पर्श करण्यास सुरुवात केली. मला धक्का बसला. मी बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा त्यांनी माझ्या खांद्याला धरले.

रेस्लर-६ : पुढल्या स्पर्धा खेळायच्या नाहीत का?
बृजभूषणने फोटो काढण्याच्या बहाण्याने खांद्यावर हात ठेवला. नंतर जवळ येण्याचा प्रयत्न केला. मला पुन्हा-पुन्हा धरण्याचा प्रयत्नात होते. वाचण्यासाठी मी दूर गेले. ‘जास्त स्मार्ट होऊ नकोस. पुढल्या स्पर्धा खेळायच्या नाहीत का? अशी धमकी दिली.’

– खाप पंचायत आक्रमक,९ जूनचा अल्टीमेटम  : बृजभूषणला पोलिसांनी ९ जूनपर्यंत अटक न केल्यास देशभर आंदोलनाचा इशारा खाप कमिटीने दिला.