होय खरे आहे ! या राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न दूर
-पुढीलवर्षी तमिळनाडूत विधानसभा निवडणुका
प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपाच्या दृष्टीने दक्षिण भारत त्यातही तमिळनाडूसारखे मोठे राज्य आव्हानात्मक ठरताना दिसून येत आहे. भाषा व लोकसभा मतदारसंघ फेररचनेच्या मुद्द्यावरून द्रमुकचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारविरोधात आघाडीच उघडली आहे. पुढील वर्षी तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला शह देण्यासाठी भाजपाने अण्णा द्रमुकबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, निवडणुकीआधीच अण्णा द्रमुकचे प्रमुख इडापल्ली पलानीस्वामी यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली आहे. राज्यात युतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा असेल, असं त्यांनी बुधवारी म्हटलं आहे. इतकंच नाही तर सत्तावाटपात कुठलीही तडजोड होणार नाही, अशा इशाराही पलानीस्वामी यांनी दिला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतरही भाजपाचे नेते संयम दाखवत आहेत.
१९६७ पासून तमिळनाडूची सत्ता द्रमुक व अण्णा द्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांकडे राहिलेली आहे. त्यामुळेच तिथे काँग्रेस वा भाजपाला प्रादेशिक पक्षांचे हात धरूनच वाटचाल करावी लागत आहे. गेल्या ११ वर्षात भाजपाची देशभरात घौडदौड सुरू असली तरीही तमिळनाडू व केरळ या दोन राज्यांमध्ये पक्षाला फारसं यश मिळालेलं नाही. राज्यात द्रमुकच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-डावे पक्ष तसेच काही दलित संघटना व मुस्लीम लीग अशी सामाजिकदृष्ट्या भक्कम आघाडी आहे. त्याला रोखण्यासाठी भाजपाचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. हीच बाब लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एप्रिलमध्ये अण्णा द्रमुकबरोबर युतीची घोषणा केली. मात्र, पक्षाचे प्रमुख इडापल्ली पलानीस्वामी हे भाजपाला कुठलाही थारा देत नसल्याचं दिसून येत आहे.
तमिळनाडूत पुढील वर्षी भाजपा व अण्णा द्रमुकच्या युतीचे सरकार स्थापन होईल, असं विधान करीत राज्यात आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असा अप्रत्यक्ष इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला होता. त्यांच्या या विधानानंतर माध्यमांनी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “भाजपाबरोबर आमची युती असली तरीही सरकारवर फक्त अण्णा द्रमुक पार्टीचेच नियंत्रण राहील आणि मुख्यमंत्री मीच होईल”, असं इडापल्ली पलानीस्वामी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न अपूर्णच राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, पलानीस्वामी यांनी घेतलेल्या या ठाम भूमिकेमागे एक सावध रणनीती असू शकते, असं सूत्रांनी सांगितलं आहे. २०२६ मध्ये जर भाजपा-अण्णा द्रमुकच्या युतीचे सरकार नक्कीच येईल; पण सत्तेच्या वाटपाबाबत सध्या सार्वजनिक घोषणा करणे धोक्याचे आहे, अशी चर्चा पलामीस्वामी यांनी अमित शाहांबरोबर केली असल्याची माहिती आहे.


