हे सांभाळाताहेत खर्च : १६ दिवस मतदान यंत्रे गोदामात

हे सांभाळाताहेत खर्च : १६ दिवस मतदान यंत्रे गोदामात

-निकालाची २१ तारखेपर्यंत करावा लागेल प्रतीक्षा

प्रतिनिधी
सातारा: राज्यातील नगरपालिकांची मतमोजणी २१ तारखेपर्यंत लांबणीवर गेल्याने आता ही मतदानयंत्रे तब्बल १८ दिवस सांभाळावी लागणार आहेत. यासाठीची यंत्रणा उभारण्यापासून ते त्यावरील सर्व खर्चाची जबाबदारी ही त्या त्या पालिकांना करावी लागणार असल्याने या निर्णयाचा भुर्दंड त्यांच्या गळ्यात पडलेला आहे.

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. मात्र ही मतदान प्रक्रिया राबवली जात असताना अंतिम दोन दिवसांमध्ये राज्यातील काही नगरपालिकांचे मतदान लांबणीवर टाकत ते २० डिसेंबर रोजी तसेच त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्याचा नवा आदेश निघाला. काही नगरपालिकांचे मतदान लांबल्यावर त्या त्या नगरपालिका हद्दीतील राजकीय नेत्यांकडून २ डिसेंबरला होणाऱ्या पालिकांचे निकाल ठरल्याप्रमाणे ३ डिसेंबर रोजी लावू नयेत अशी मागणी करण्यात आली. यासाठी काहींकडून निवडणूक आयोगापासून न्यायालयाचेही दरवाजे ठोठावण्यात आले. यावर सुनावणी झाल्यावर यापूर्वी ३ डिसेंबर रोजी ठरलेली मतमोजणी रद्द करून राज्यातील सर्वच पालिकांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्याचा नवा आदेश निघाला.

या नव्या आदेशामुळे राज्यातील ज्या नगरपालिकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. त्यांची मतदान यंत्रे पुढील तब्बल १८ दिवस सांभाळण्याची वेळ आली. यासाठी अनेक पालिकांकडे तशी पुरेशी यंत्रणा नसल्याने त्यासाठी धावपळ करावी लागली. शिवाय ही मतदान यंत्रे सांभाळण्यासाठी उभी करावी लागणारी गोदामांची व्यवस्था, त्या जागेवरची सीसीटीव्ही, अन्य सुरक्षा या पातळीवरही ऐनवेळी निर्णय घ्यावे लागले आहेत.

दरम्यान पूर्वी ही सर्व मतदान यंत्रे केवळ एकच दिवस सांभाळावी लागणार होती. मात्र नव्या आदेशामुळे आता ही मतदानयंत्रे तब्बल १८ दिवस सांभाळावी लागणार आहेत. यामुळे या व्यवस्थेवरचा खर्च वाढणार आहे. याचा खर्च कुणी करायचा हा मुद्दा राज्यातील पालिका प्रशासनाच्या पातळीवर जागोजागी चर्चेला आला आहे. यावर चौकशी केल्यावर हा खर्च त्या-त्या पालिकांनाच करावा लागणार असल्याचे सांगण्यात आल्याने अगोदरच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पालिकांवर या नव्या खर्चाचा ताण पडणार आहे.

साताऱ्यात ३ डिसेंबर रोजी सात पालिका व एका नगरपंचायतीच्या मतमोजणीची तयारी केली होती. त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग, सुरक्षा यंत्रणाही उभी करण्यात आली होती. जागाभाडे, टेबल लावणे, सीसीटीव्ही कॅमेरे उभारणे, मतमोजणी टेबलाभोवती सुरक्षा कवच उभारणे हे काम अगोदरच झालेले असल्याने आता हा खर्च वाया गेला आहे. तर दुसरीकडे ही मतदान यंत्रे तब्बल १८ दिवस सांभाळावी लागणार असल्याने त्याचा खर्च वाढणार आहे. हा खर्च पालिकांना स्वतः करावा लागणार असून ही रक्कम काही लाखांच्या घरात असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

पालिकांच्या निवडणुकीचे मतदान मंगळवारी (दि २) झाले आहे. यापूर्वीच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे बुधवारी (दि ३) मतमोजणी होणार होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आता २१ रोजी वाईसह राज्यातील सर्व पालिकांची मतमोजणी एकाच दिवशी होणार आहे. या कालावधीत मतदान यंत्र सुरक्षित ठेवणे आणि या अनुषंगाने मतमोजणीपर्यंतचा सर्व खर्च संबंधित पालिकेकडून केला जाईल असे वाईच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले.