हे भलतंच घडलं : भाजप आमदार थेट सभागृहात पाहत होते पॉर्न व्हिडिओ
-आमदार म्हणतात, हा सुनियोजित कट
प्रतिनिधी
त्रिपुरा : त्रिपुराचे भाजप आमदार जादब लाल नाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात ते विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात पॉर्न पाहत असताना दिसून येत आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ 30 मार्च म्हणजे आजचाच आहे. नाथ यांच्या मागे बसलेल्या एका आमदाराने हा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला.
या प्रकरणी त्रिपुराचे भाजप प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य म्हणाले की, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मी जादब लाल नाथ यांच्याशी चर्चा केली. पक्ष त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागेल. दुसरीकडे, नाथ यांनी एका सुनियोजित कट कारस्थानांतर्गत हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणी पक्षापुढे बाजू मांडणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
जादब लाल नाथ त्रिपुराच्या बागबासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना उमेदवारी दिली. पण सीपीएमच्या उमेदवार बिजीता नाथ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2023 च्या निवडणुकीत भाजपने पुन्हा जादब लाल नाथ यांच्यावर विश्वास दाखवला. त्यात ते विजयी झाले.
2012 मध्ये कर्नाटकातही अशीच एक घटना घडली होती. सहकार मंत्री लक्ष्मण सवदी तथा महिला व बालकल्याण मंत्री सी. सी. पाटील यांना सभागृहातच पॉर्न पाहताना पकडण्यात आले होते. त्यावेळीही विधानसभेचे अधिवेशन सुरू होते. विधानसभेच्या कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या एका स्थानिक वृत्तवाहिनीने मंत्र्यांची ही कृती आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती. त्यानंतर माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी ही घटना लोकशाहीवरील काळा डाग असल्याची टीका केली होती.