हे घ्या! थेट भाजपाच्या उपमुख्यमंत्री यांनीच केली राजीनाम्याची मागणी

हे घ्या! थेट भाजपाच्या उपमुख्यमंत्री यांनीच केली राजीनाम्याची मागणी

-प्रशांत किशोर यांनी केली स्पष्टीकरणाची मागणी

प्रतिनिधी
बिहार : बिहारमधील राजकारण सध्या तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने चर्चांना उधाण आले आहे. ‘जन सुराज पार्टी’चे संस्थापक प्रशांत किशोर यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण द्या किंवा आपल्या पदावरून पायउतार व्हा, अशी थेट मागणी आर.के. सिंह यांनी केली आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते काय म्हणाले?
आर.के. सिंह यांनी विशेषतः सम्राट चौधरी यांनी त्यांची पदवी सार्वजनिक करावी अशी मागणी केली.
माध्यमांशी बोलताना ७२ वर्षीय आर.के. सिंह म्हणाले की, “या नेत्यांनी साधलेले मौन पक्षाची विश्वासार्हता बिघडवत आहे.”
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपला आरा मतदारसंघ गमावल्यापासून सिंह हे पक्षाच्या नेतृत्वावर नाराज आहेत. एनडीएचे घटक पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चा करत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

सिंह म्हणाले, “त्यांच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. प्रशांत किशोर सतत म्हणत आहेत की सम्राट चौधरी सातवी नापास आहेत, त्यामुळे त्यांनी लोकांना आपली पदवी दाखवावी. अन्यथा, याचा पक्षाच्या प्रतिमेवर आणि विश्वासार्हतेवर वाईट परिणाम होत आहे.” त्यांनी प्रशांत किशोर यांच्या नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेचा संदर्भ दिला. त्यात किशोर यांनी अनेक बिहारी मंत्र्यांवर आणि भाजपा-जेडीयू नेत्यांवर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे आरोप केले होते.

असेही म्हटले जात आहे की सम्राट चौधरी यांनी आपले नाव तीन-चार वेळा बदलले आहे. त्याचप्रमाणे, दिलीप जयस्वाल यांच्यावर खुनाचा आरोप आहे, असेही त्यांनी सांगितले. या नेत्यांनी एकतर प्रशांत किशोर यांच्या आरोपांना कायदेशीर प्रत्युत्तर द्यावे किंवा पदावरून बाजूला व्हावे, अशी भूमिका आर. के. सिंह यांनी मांडली.