हे घ्या! आता या ठिकाणी भाजपा विरुद्ध भाजपा उभी ठाकली
-कौटुंबिक वादाचे ठरले कारण
प्रतिनिधी
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यातील कौटुंबिक वाद प्रत्येकाला माहीत आहे. मात्र, केवळ तृणमूल काँग्रेसच नव्हे, तर भाजपादेखील कौटुंबिक वादामुळे अडचणीत आला आहे. भाजपाचे आमदार अन् खासदार असणाऱ्या दोन सख्ख्या भावांमध्ये सुरू असलेल्या वादाने भाजपाच्या चिंता वाढवल्या आहेत. काय आहे हे नेमके प्रकरण? कौटुंबिक वादाने भाजपाच्या अडचणी कशा वाढवल्या? जाणून घेऊयात.
कोलकातापासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील ठाकूरनगर येथे मतुआ दलित समुदायाचा प्रभाव आहे.
मात्र, या दोन भावांच्या वादामुळे हा समुदायदेखील विभागला गेल्याचे पाहायला मिळत आहे.
बंगावचे खासदार शंतनू ठाकूर हे नरेंद्र मोदी सरकारमध्ये बंदर, जहाज व जलमार्ग राज्यमंत्री आहेत. तर त्यांचे मोठे भाऊ सुब्रत हे पश्चिम बंगाल राज्यामधील गायघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
यापूर्वी दोन्ही भाऊ त्यांच्या मावशी व टीएमसी खासदार ममता बाला ठाकूर यांच्याशी असलेल्या वादामुळे चर्चेत आले होते.
राज्यात लवकरच होणाऱ्या निवडणुकांसाठी म्हणून मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) केली जात आहे. त्याच मुद्द्यावरून दोन्ही भावांमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. दोन्ही भावांनी ‘मतुआ कार्ड’ किंवा ‘हिंदू कार्ड/प्रमाणपत्र’ जारी करण्यासाठी दोन वेगवेगळी शिबिरे आयोजित केली आणि त्यानंतरच वाद सुरू झाला. समुदायाच्या लोकांसाठी हे प्रमाणपत्र मिळवणे, नागरिकत्व (सुधारणा) कायद्यांतर्गत नागरिकत्व सुरक्षित करण्यासाठीचे पहिले पाऊल आहे.
१९५० पासून बांगलादेशच्या अस्तित्वापर्यंत लाखो मतुआ नागरिक प्रामुख्याने बांगलादेशमधून पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झाले आणि त्यांच्यापैकी अनेकांकडे नागरिकत्वाची कागदपत्रे नाहीत. आज राज्यात दुसरा सर्वांत मोठा दलित गट असलेल्या या समुदायाचा नागरिकत्व (सुधारणा) कायद्याला आणि त्यातून भाजपाला असलेल्या पाठिंब्यामुळेच पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १८ जागा जिंकल्या होत्या. ही राज्यात संसदीय निवडणुकीतील भाजपाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती.


