हे आहे कारण : काँग्रेसचा हा बडा नेता भाजपाचा वाटेवर
-इंडियन एक्स्प्रेसचे वृत्त
प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळच्या तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. काही दिवसांपूर्वी शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्याबरोबर त्यांनी सेल्फीही काढला. काँग्रेसने आपल्या नीतीमध्ये बदल करत मतपेटीच्या बाहेरचा विचार करून नव्या मतदारांना आकर्षित केले पाहिजे, असा एक विचार त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे शशी थरूर हे काँग्रेस सोडून भाजपात जाणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. या सर्व अटकळांबद्दल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला आणि काँग्रेसमधील पक्षांतर्गत मतभेदांसह अनेक विषयांवर मोकळेपणाने भाष्य केले.
द इंडियन एक्स्प्रेसच्या ‘वर्तमानम’ या मल्याळम भाषेतील साप्ताहिक पॉडकास्टमध्ये बोलताना थरूर यांनी काँग्रेस पक्षाबाबत रोखठोक मते मांडली आहेत. लिझ मॅथ्यू यांना दिलेल्या मुलाखतीत थरूर यांनी उदारमतवाद आणि भारताच्या बहुलवादी नीतिमत्तेवरील त्यांचा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला. “मी नेहमीच एक उत्कृष्ट उदारमतवादी आहे. मी सांप्रदायिकतेला विरोध करतो आणि आर्थिक विकासासोबत सामाजिक न्यायावर विश्वास ठेवतो”, असं शशी थरूर म्हणाले.
भाजपामध्ये सामील होण्याच्या चर्चांना थरूर यांनी पूर्णविराम दिला. “पक्षाबरोबर माझे वैचारिक मतभेद असले तरी मी कुठेही जाणार नाही”, असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाच्या मुद्द्यावर बोलताना तिरुअनंतपुरमचे खासदार म्हणाले, “माझ्याच पक्षातील काही लोक मला विरोध करतात, पण मी भारत आणि केरळच्या भविष्याचा विचार करूनच बोलतो. माझ्यावर कितीही टीका झाली तरीही मी काँग्रेसशी एकनिष्ठ राहणार आहे. गरज पडल्यास पक्षाने दिलेली मोठी जबाबदारी स्वीकारण्याची माझी तयारी आहे.”


