हिमाचल निवडणूक; काँग्रेसला घोडेबाजार होण्याची भीती
-विजयी आमदारांना जयपूरला हलविणार
प्रतिनिधी
हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीतील सुरुवातीच्या कलांनुसार, भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई दिसत आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी काँग्रेसला घोडेबाजार होण्याची भीती वाटत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला घोडेबाजाराची भीती वाटतेय. भाजप विजयी उमेदवार फोडू शकतो या भितीनं धास्तवालेल्या काँग्रेसनं उमेदवारांना राजस्थानमध्ये हलवण्याची तयारी सुरु केली आहे. ‘ऑपरेशन लोटस’ची शंका आल्यानं काँग्रेसनं हिमाचल प्रदेशातील आमदारांना राजस्थानला पाठवण्याची योजना आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलआणि ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुडा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
-प्रियांका गांधी शिमल्यात दाखल
या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रियांका गांधी शिमल्यात दाखल झाल्या आहेत. विजयी उमेदवारांना जयपूरला हलविण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती. यावेळी राज्यातील 55 लाख मतदारांपैकी सुमारे 75 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. हिमाचल प्रदेशमध्ये 68 सदस्यीय विधानसभा आहे. या निवडणुकीत एकूण 412 उमेदवार रिंगणात होते, त्यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. काँग्रेसला आपल्या विजयाची खात्री असताना भाजप पुन्हा सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे.


