“हम सेफ है, तो एक है’ कुणाला घातल्या टोप्या, जाहिरातीत दम आहे भाऊ!.
-चांद्यापासून ते बांध्यापर्यंत उडाला राजकीय धुराळा
गजानन ढाकुलकर
नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे. चांद्यापासून- बांद्यापर्यंत आरोप- प्रत्योरापाचा नुसता धूरळा उडतोय. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे अपयश ठासून सांगितले जात आहेत तर सत्ताधारीही विरोधकांना लाडकी बहीण योजनेचे शत्रू ठरवण्याच्या प्रयत्नात आहेत. लाडकी बहीण योजना हे सत्ताधाऱ्यांचे या निवडणुकीतील सर्वात मोठे शस्त्र आहे. परंतु, हे शस्त्र ऐनवेळी निकामी ठरले तर काय, या भीतीतून सत्ताधाऱ्यांपैकी एक असलेल्या भाजपने आपल्या ‘प्लॅन बी’ची अंंमलबजावणी सुुरू केली आहे. त्यानुसार, ‘कटेंगे तो बटेंगे’ची घोषणा पुरोगामी महाराष्ट्रातही निनादायला लागली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा सर्वप्रथम महाराष्ट्रात दिली. आता राज्याचे इतर नेतेही त्यांचाच कित्ता गिरवत आहेत.
परंतु, महाराष्ट्रात प्रचाराला आलेल्या पंतप्रधानांंना ही घोषणा उच्चारणे कठीण जात होते. कारण, पंतप्रधान हे संविधानिक पद आहे. त्यामुळे मोदींनी नवीन पर्याय शोधला आहे. ‘एक है, तो सेेफ हैं’ हा तो पर्याय. सोमवारी सर्व प्रमुख दैनिकांमध्ये उमटलेल्या भाजपच्या जाहिरातीत ‘एक है, तो सेेफ हैं’ या वाक्यात महाराष्ट्राच्या प्रमुख समाजाचे प्रतीक असलेल्या टोप्यांचे चित्र पेरले आहे. यात शीवकालीन टोपी आहे. मावळे घालायचे तशी टोपी आहे. शाहू महाराजांच्या काळातील पगडी आहे. पुणेरी पगडी आहे. आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले शिरस्तान आहे.कोळी बांधव घालतात ती लाल टोपी आहे. गावाखेडयात अजूनही घातली जाते ती गांधी टोपी आहे. आंंबेडकर जयंतीच्या रॅलीत घातली जाणारी निळी पगडी आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जगभरातील स्वयंसेवक घालतात ती काळी टोपीही आहे. फक्त एक टोपी नाही आहे ती म्हणजे मुस्लीम बांधव घालतात ती गोल टोपी. मुस्लीम बांधवांची गोल टोपी यात का नाही, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
भाजपच्या जाहिरातीत ‘एक है, तो सेेफ हैं’असे ठळकपणे लिहिले आहे. या ‘एक’मध्ये मुस्लीम समाज नाही का? असेल तर त्यांचे प्रतीक असलेली गोल टोपी या जाहिरातीत का नाही? मुस्लीम टोपीचे चित्र अनावधानाने सुटले की मुद्दाम सोडण्यात आले? मुद्दाम सोडण्यात आले असेल तर महाराष्ट्रात मुस्लीम समाजच नाही, असे भाजपला सुचवायचे आहे का?, असे अनेक प्रश्न या जाहिरातीने उपस्थित केले आहेत.


