साकोलीच्या सभेत राहुल गांधीची शेतकरी कर्जमाफीची गॅरंटी
-सरकार आल्यास पहिल्याच दिवशी अग्निवीर योजना बंद
गजानन ढाकुलकर
साकोली (भंडारा ) : भारतीय सैन्य दलात भरतीसाठी केंद्र सरकारने अग्निवीर ही योजना लागू केली आहे. मात्र या योजनेला देशभरात अनेक ठिकाणांहून विरोध झाला. विरोधी पक्ष आणि देशातले बहुसंख्य युवक अजूनही या योजनेचा विरोध करत आहेत. काँग्रेसचा देखील या योजनेला पहिल्यापासून विरोध आहे. दरम्यान, आता काँग्रेसने या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभर काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करत आहेत. आज त्यांनी महाराष्ट्रातल्या भंडाऱ्यात प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी घोषणा केली की, देशात काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही पहिल्याच दिवशी अग्निवीर योजना बंद करू.
राहुल गांधी म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी बेरजोगारीचा मुद्दा मांडायचे आणि म्हणायचे देशातील २ कोटी तरुणांना रोजगार देणार. परंतु त्यांनी काहीच केलं नाही. उलट त्यांनी नोटबंदी केली, चुकीचा जीएसटी लागू केला. अग्निवीर योजना आणली, या सगळ्यामुळे देशात होते तेवढे रोजगारही बंद झाले. त्यामुळे दोन गोष्टी मी आधीच स्पष्ट करतो. यांची जी अग्निवीर योजना आहे ती आम्ही आमचं सरकार येताच बंद करू. कारण आम्हाला एकाच देशात दोन प्रकारचे शहीद नकोत. एक शहीद, ज्याला सरकार पेन्शन देणार, शहिदाचा दर्जा देणार, त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण करणा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या दुसऱ्या जवानाला मात्र शहिदाचा दर्जादेखील दिला जाणार नाही, त्या जवानाच्या कुटुंबाला भरपाई मिळणार नाही, पेन्शन मिळणार नाही. हा भेदभाव आहे.


