शिवसेनेचा टायगर मैदानात; घेणार दिग्गजांच्या भेटी

शिवसेनेचा टायगर मैदानात; घेणार दिग्गजांच्या भेटी

-पुन्हा एकदा डरकाळी

प्रतिनिधी
मुंबई : ईडी कोठडीतून जामिनावर बाहेर आलेले फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटणार असल्याचे समजते. तसेच राऊतांच्या जामिनाला हरकत घेणाऱ्या ईडीच्या याचिकेवरही आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

ईडीने राऊतांना मनी लॉड्रिंगप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर 102 दिवस कोठडी घालवल्यानंतर राऊतांना काल जामीन मंजूर झालाय. त्यामुळे ते पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले.

आज घेणार सर्वांच्या भेटीगाठी

संजय राऊत यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर आज ते मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तिथून सामना कार्यालयात भेट देतील. त्यानंतर सिल्वर ओक गाठून शरद पवारांशी चर्चा करणार आहेत. याशिवाय, भारत-जोडो यात्रेतही ते सहभागी होण्याची शक्यता आहे.

– काँग्रेसच्या भारत जोडोत ‘राष्ट्रवादी’चे दिग्गज

संजय राऊतांची ईडी चौकशी सुरू झाली. त्यानंतर राहुल गांधी यांनी राऊत यांना एक पत्र लिहिले. त्यात काँग्रेस त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. सध्या राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. आज या यात्रेत सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार उपस्थित राहणार आहेत.

आदित्य ठाकरे यांची हजेरी

भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत. शरद पवारांची तब्येतही म्हणावी तशी ठीक नाही. त्यामुळे ते शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनालाही शेवटच्या दिवशी उपस्थित राहिले. त्यांचे भाषणही दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवले. त्यामुळे पवारही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत. मात्र, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या नांदेड येथील सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेलाही राऊत यांची उपस्थिती असण्याची शक्यता व्यक्त होतेय.