शिवसेना म्हणते, आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही
-शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचे म्हणणे
प्रतिनिधी
मुंबई : अमित शहा-अजित पवार यांच्यात दिल्लीमध्ये बैठक झाली. आणि ही बैठक नियोजित होती. असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. तसेच भाजपला कोणासोबत जायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही, असा थेट इशारा संजय शिरसाट यांनी भाजपला दिला आहे.
नुकतीच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत यांची देखील उपस्थिती होती. याच भेटीबाबत कालच्या सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी एक मोठा खुलासा केला आहे. यात शरद पवार म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ’पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. या खुलाशानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. त्यानंतर या चर्चांना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. उद्या सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटलांनी यांच्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनी देखील याबाबत विधान केले आहे. अमित शहा-अजित पवार यांच्यातील बैठक नियोजित असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे.
संजय शिरसाट म्हणाले, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेट झाली. दीड तास फक्त चहा-पाणी आणि इतर गप्पा होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंची कार्यकर्त्यांनी वाजवलेली आहे, हे शरद पवारांना माहित आहे. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची वाजवलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही. अजित पवारांच्या बंडाला शरद पवार यांची मुक संमती आहे. प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे ही शरद पवारांची माणसे आहेत. त्यांना त्यांची कातडी वाचवायची आहे. यांना सत्तेत राहायचे आहे.
संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले, भाजपने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही. राष्ट्रवादी थेट भाजपसोबत जाणार नाही. राष्ट्रवादी हा घात करणारा पक्ष आहे. ते पाठीराखे म्हणून राहतील मात्र सत्तेत येणार नाही. राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अजित पवार बंडासाठी पहिल्यापासून तयार आहे. ते नेतृत्व करु शकतात. मते विभागली गेल्यामुळे त्यांना कळून चुकले आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भविष्य नाही. त्यामुळे ते पर्याय शोधत आहेत.


