शिंदे सरकारला चपराक : उद्याच निवडणुका घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
-मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित
प्रतिनिधी
मुंबई : मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका उद्याच घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला दिले आहेत. मुंबई विद्यापीठाने या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने विद्यापीठाला फटकारलं आहे. त्यामुळे सिनेटच्या निवडणुका आता उद्याच घ्याव्या लागणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
-ठाकरे गटाची न्यायालयात धाव
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित केल्यानंतर ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे आता रविवारी २२ सप्टेंबरलाच मुंबई विद्यापीठाची निवडणूक होणार आहे. मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढत निवडणुका पुढे ढकल्याचा निर्णय जाहीर केला होता. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राने एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री याआधी कधीही पाहिलेले नाहीत, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने सिनेट निवडणूक उद्याच घ्या असं म्हटलं आहे.
-आदित्य ठाकरे यांचा थेट आरोप
आदित्य ठाकरे म्हणाले की, जे निवडणूक लढवत आहेत त्या उमेदवारांचा आज विजय झाला आहे, सिनेटच्या सर्व उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. तसंच आमचा विजय निश्चित झालेला आहे. डरपोक सीएम म्हणजे नावापुढे डीसीएम लावायला हवं, हे आता स्पष्ट झालेलं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
-याचिकाकर्ते म्हणतात…
“आज न्यायालयाने दिलेला निकाल हा लोकशाहीचा विजय आहे, आम्ही पूर्णपणे निवडणुकीला उद्या सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना सुद्धा आमची शिवसेनेची फौज तयार आहे. आम्ही मागील वेळेस सारखे दहाच्या दहा जागांवर विजयी होऊ. रडीचा डाव विद्यापीठ आणि राज्य सरकारने खेळला पण त्याचा काही उपयोग झाला नाही कोर्टाने निर्देश दिले आहेत. आम्हाला आता काही तासात तयारी करायची आहे पण आम्हाला चिंता नाही आम्ही पूर्णपणे तयार आहोत.” असं याचिकाकर्ते प्रदीप सावंत म्हणाले.


