शशिकांत वारिसे यांच्या खुनावरून या नेत्याचा हल्लाबोल
-रिफायनरीवरून फडणवीस लक्ष
प्रतिनिधी
मुंबई : शशिकांत वारिसे यांच्या विरोधानंतर त्यांची हत्या झाली. त्यांच्या हत्येच्या एक दिवस आधीच गृहमंत्री म्हणाले होते, रिफायनरीला कोण आडवा येईल ते पाहू. याला योगायोग समजायचा का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. संजय राऊत याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, ही झुंडशाही आहे. गुंडशाही आहे. ज्या आरोपींना अटक केली आहे. त्यामागील खरे सूत्रधार कोण हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना माहित आहे. हत्येमागच्या सूत्रधाराला अटक केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. केंद्रीय गृहमंत्रालायाने स्पेशल टीम याठिकाणी पाठवून या व याआधीच्या हत्यांचा तपास करावा, यासाठी पाऊले उचलणार असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांसारखे ज्वलंत निर्भीड पत्रकार ज्या कोकणच्या भूमीत जन्मास आले त्याच भूमीत एका पत्रकाराची हत्या होणे धक्कादायक आहे. याआधी विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ‘ईडी’, ‘सीबीआय’ व पोलीस यंत्रणेचा वापर होत असे, पण आता विरोधकांच्या हत्याच होऊ लागल्या हे चिंताजनक आहे. महाराष्ट्रात हे काय सुरु आहे?, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला आहे. संजय राऊत यांनी यावरुन देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.


