वादग्रस्त वक्तव्य : भाजपाचा हा नेता म्हणतो,पैसे दिले, मतदान आपल्याला
-रोषणगाव येथे विकासकाम शुभारंभप्रसंगी वक्तव्य
प्रतिनिधी
बीड : मला नारायणने सांगितले आहे, आपण यांना पैसे दिले आहेत, हे आपल्यालाच मतदान करणार आहेत. तुम्ही कुणाचेही ऐकू नका, आपल्या गावाचे पाहा हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपचे जालन्याचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी. ते बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.
बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे रस्त्याचे डांबरीकरण, जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा कामाचे भूमिपूजन, कोल्हापुरी बंधारा बांधकाम आदी विकासकामांचे भूमिपूजन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित जाहीर कार्यक्रमात मंत्री दानवे यांनी हे वक्तव्य केले आहे. आमदार नारायण कुचे यांनीच आपल्याला हे सांगितल्याचे मंत्री दानवे या वेळी म्हणाले. गावातल्या लोकांनी आता दुसरा कोणताही विचार न करता आपल्या गावाचे पाहावे, असेही दानवे या वेळी म्हणाले.
–काय म्हणाले दानवे बघा ?
नारायणने (आमदार नारायण कुचे) मला सांगितले, आपण यांना पैसे दिले आहेत हे आपल्याला मतदान करणार आहेत. कुणाचे ऐकू नका, आपल्या गावाचे पाहा. आम्ही सांगितले, नारायणने सांगितले. या वेळेस ते मतदान करणार आहेत, परंतु मतदानापेक्षा तुम्ही बाेलायला सुरुवात करा. गावात लोकांना सांगा फारुक अब्दुल्ला त्यांना (काँग्रेसला) जाऊन भेटतात. शरद पवार भेटतात, मायावती भेटतात, नीतिशकुमार माझ्यासोबत मंत्री होते आता ते म्हणताहेत मी पंतप्रधान होईल. आता त्यांनी ३० तारखेला बिहारमध्ये मीटिंग ठेवली आहे. मी कालच बिहारहून आलो. त्यांनी पहिली मीटिंग बोलावली, कुणी जायला तयार नव्हते. आता त्यांनी पुन्हा मीटिंग बोलावली आहे. मीटिंगमध्ये काय ठरवणार आहे माहीत आहे का?, भाजपला हरवायचे आहे, असे ते ठरवणार आहेत. आयो चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा, असे विरोधकांचे धाेरण आहे. विरोधकांनी यापूर्वीही एकत्र येऊन भाजपला हरवण्याच्या गप्पा केल्या, परंतु भाजप हरला नाही.
कस्तुरवाडी ते रोषणगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी १२ कोटी, जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा कामासाठी १ कोटी ७४ लाख, लहुकी नदीवरील नळकांडी पूल बांधकाम, कोल्हापुरी बंधारा बांधकाम, मुस्लिम समाज शादीखाना बांधकाम आदी कामांसाठी दिलेल्या निधीचा उल्लेख केंद्रीय रेल्वेमंत्री दानवे यांनी केला. मात्र त्याचा विपर्यास करण्यात आल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.


