वाडीत रोहित पवारांनी का केली आमदार मेंघेवर नाव न घेता टीका?

  • वाडीत रोहित पवारांनी का केली आमदार मेंघेवर नाव न घेता टीका?

-हे ठरले प्रमुख कारण

प्रतिनिधी
नागपूर : राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार भाजपाच्या कार्यपद्धतीने अत्यंत त्रस्त झाला आहे. शिक्षित असूनही हाताला काम नाही. आरोग्याच्या सोयी नाही. शेतीला भाव नाही. याकडे लक्ष वेधण्याऐवजी ही जबाबदारी ज्या भाजपाकडे आहे़ ते मात्र समाजामध्ये धर्माच्या नावावर तेढ निर्माण करण्यात मश्गूल झाले आहे, असा आरोप जामखेड-कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी केला.

पुणे ते नागपूर ८०० किमी, असा ४२ दिवसांचा प्रवास करीत रविवारी(१० डिसेंबर) राज्यस्तरिय युवा संघर्ष यात्रेचे सायंकाळी चार वाजता आगमन झाले. दत्तवाडी वळणावर या संघर्ष यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले़ त्यानंतर या यात्रेचे रूपांतर जाहीर सभेत झाले़ त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी मंचावर आमदार रोहित पवार, रोहित पाटील, माजी मंत्री रमेश बंग, युवा नेते सलील देशमुख, युवक काँग्रेसचे राज्याध्यक्ष राजापूरकर, माजी आमदार विजय घोडमारे, जिल्हा परिषद सदस्य गुड्डू बंग, युवा सेनेचे हर्षल काकडे, राजेश जयस्वाल, वसंत इखनकर, माजी नगरसेवक श्याम मंडपे आदींची उपस्थिती होती. पुढे रोहित पवार म्हणाले, भाजपाचे नेते राज्यातून कोट्यवधींचे प्रकल्प व गुंतवणूक गुजरातमध्ये पाठवून बड्या नेत्यांना खुश करण्यासाठी गप्प बसले आहेत. संविधान बदलण्याचे षड्यंत्र व प्रयोग भाजप करीत आहे़ गृहमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असूनही नागपूर आता क्राइम कॅपिटल झाल्याचे दिसून येत आहे. नागपूरच्या एमआयडीसी बुटीबोरी, मिहानमध्ये एकही नवीन उद्योग न आल्याने प्रकल्प बंद पडत आहे़ विदर्भातील शिक्षित युवकांना रोजगार कसा मिळणार, असा प्रश्नही आमदार पवार यांनी उपस्थित केला. तसेच वाडी शहरातील समस्यांकडे लक्ष वेधत आमदार समीर मेेंघेंचा अप्रत्यक्ष समाचार घेतला. संचालन माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी केले.