वाचा एकदाचे : या लोकसभा निकालाने काँग्रेसला काय दिलं?
-दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचे सटीक विश्लेषण
प्रतिनिधी
मुंबई : आज लोकसभेचा निकाल लागला आहे. या निकालात भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता मात्र भाजपाला २४०+ जागांवर आणि एनडीएला २९०+ जागांवर यश मिळालं आहे. मात्र काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या आहेत. तर इंडिया आघाडीने जवळपास २३० ते २३५ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे हा लोकसभा निवडणूक निकाल एका अर्थाने भाजपाच्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरला आहे. याबाबत दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण दिलं आहे.
या निकालाने काँग्रेसला काय दिलं? इंडिया आघाडीचं भवितव्य राज्य पातळीवर कसं काम करेल? हा प्रश्न विचारला असता गिरीश कुबेर म्हणाले, “काँग्रेसला निकालाने काय दिलं? हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या निकालाने काँग्रेसला आपण पक्ष म्हणून जिवंत आहोत ही जाणीव या निकालाने दिली. ही फार मोठी घटना आहे. कारण गेली १५ वर्षे राहुल गांधी कसे नालायक आहेत, पप्पू आहेत, राजकारणाचं गांभीर्य नाही हेच दाखवण्याचा प्रयत्न झाला. अख्खा देश प्रसारमाध्यमांतून आणि समाजमाध्यमांतून त्यांच्या विरोधात बोलत होता. तरीही मनाची उभारी न सोडता हा माणूस उभा राहिला, काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा केली. राजकीय जग त्यांना मोडीत काढत होतं, त्यानंतर काँग्रेसला उभारी देत राहिले. काँग्रेसला ज्या जागा मिळाल्या ते एक अद्भूत उदाहरण आहे असं म्हणता येईल. ५० ते ५२ जागांवरुन इतक्या जागा मिळवणं हे यश महत्त्वाचं आहे. यापुढचं देशातलं राजकारण दोन ध्रुवांचं असेल. काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांभोवती राजकारण फिरेल. महाराष्ट्रात, हरियाणात निवडणुका आहेत त्यात बदल होताना दिसतील. हिंदीत सांगायचं झालं तर ‘सारे जमींपर’ असं वर्णन करता येईल.”


