लोकसभेत मविआला 40 जागा मिळतील
-बरे झाले गद्दार गेले
-उद्धव ठाकरे यांचा प्रहार
प्रतिनिधी
मुंबई : एक गोष्ट महाराष्ट्राच्या लक्षात आली असेल की, बरे झाले गद्दार गेले. त्यांच्यामुळे हिरे सापडले. आजवर त्यांना आम्ही खूप पैलू पाडले आणि हिरा म्हणून आम्ही त्यांना नाचवत होतो. पण ते दगड होते, ते गेले बुडाले.” असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला. तसेच ”सर्वे 35 जागा सांगत आहे पण मी म्हणतो की, लोकसभेला मविआला 40 जागा मिळतील.” असा विश्वासही ठाकरेंनी व्यक्त केला.
आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मालेगावातील नेते अद्वेय हिरे यांना शिवबंधन बांधले. अद्वेय हिरेंचा ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते.
–मी भाजपचा त्याग केला
अद्वेय हिरे म्हणाले, मी पदासाठी मागणी केली नव्हती. तालुक्यातील शेतकऱ्यांना आत्महत्याची वेळ आली. आम्ही जनआंदोलन केले पण त्यांनी शेतकऱ्यांना वाचवू शकले नाहीत. त्यामुळे मी भाजपचा त्याग केला. आम्ही शिवसेनेत त्यामुळेच सहभागी होत आहोत. भाजपला काल माझी आठवण आली.
– मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचा नेताच बसवू
अद्वेय हिरे म्हणाले, कालपासून मला फोन येत होते, आजही येत नाही. पण मी खोके घेण्यासाठी आलो नाही. बाप बदलणाऱ्या औलादीपैकी मी नाही. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचा नेताच बसवू. अजून 49 मतदारसंघातील नेते थांबले आहेत त्यांची कुचंबना होत असून ते शिवसेनेत येताना आगामी काळात दिसतील. गद्दारांना जनता धडा शिकवतील. भाजपमध्ये व्यक्तीस्वातंत्र्य नाही. काळीटोपी जे सांगते तेच आम्हाला बोलावे लागते. भाजपमध्ये सर्व स्क्रिप्टेड असते. फक्त बळी कुणाचा घ्यायचा हे स्क्रिप्टेड नसते. संजय राऊत म्हणाले, संयुक्त महाराष्ट्रात भाऊसाहेब हिरे यांची भूमिका महत्वाची होती. कठोर भूमिका मांडणाऱ्यांत ते होते. त्यांचेच वारसदार अद्वेय हिरे हे आता शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. शिवसेना एक परिवार आहे. कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. हिरेंमुळे शिवसेनेला नेतृत्व मिळेल. शिवसेना दोन पाऊले पुढे जाईल. शिवसेनेला बळ मिळुन उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला बळ मिळेल. शिवसेना संकटात असताना आपण प्रवेश केला याला महत्व आहे.
-हे आहेत अद्वय हिरे ?
माजी मंत्री भाऊसाहेब हिरे यांचे अद्वय हिरे हे पूत्र आहेत. त्यांनी यापूर्वी लढवलेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलनही केले होते. त्यानंतर त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला.


