लातुरात मोठी घडामोड; विलासराव देशमुख यांचे सुपुत्र भाजपच्या वाटेवर
-मात्र, पक्ष प्रवेशाला थेट विरोध
प्रतिनिधी
नागपूर : काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याची कुजबुज इतक्या दिवस होती. मात्र, आता भाजपचे नेते आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे या विषयाची वाच्यता करत अमित आणि धीरज देशमुख यांच्या पक्षप्रवेशाला थेट विरोध दर्शवला आहे. त्यामुळे खरेच देशमुख भाजपमध्ये जाणार का, ही चर्चा पुन्हा एकदा तुफान रंगली आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे तरुण नेतृत्व सत्यजीत तांबे हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. तांबे यांना शिक्षक पदवीधर उमेदवारी दिली नसल्यामुळे या चर्चेने जोर धरला आहे. आता त्यात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेल्या वक्तव्याने यात भर पडली आहे.
खरे तर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली. तेव्हाच अमित देशमुख, धीरज देशमुख आणि अशोक चव्हाण काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली. त्यात वंचित बुहजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याने राळ उडाली. त्यांनी आता काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिले नाही. लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडणवीसांच्या मांडीवर बसतील म्हणत या चर्चेचा चांगलीच फोडणी दिली.
-आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणतात…
आता आमदार संभाजी पाटील निलंगेकर एका कार्यक्रमात जाहीरपणे आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, लातूरचे प्रिन्स, राजकुमार असलेले आमदार अमित देशमुख कधीही जनतेचे प्रश्न घेऊन लोकांत गेले नाहीत. मात्र, आता त्यांना भाजपमध्ये यायचे आहे. तशी हवा त्यांनी निर्माण केली. देशमुखांना सतत सत्तेत राहण्याचा सोस आहे, पण त्यांना भाजपमध्ये घेणार नाही. ते भाजपमध्ये आलेले कार्यकर्त्यांना आवडणार नाही, म्हणत त्यांना जाहीर विरोध केला आहे.
– कोण आहे अमित देशमुख ?
अमित देशमुख हे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे पुतणे, तर रितेश देशमुख व आमदार धीरज देशमुख यांचे मोठे भाऊ आहेत. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी 1997 मध्ये नगर परिषद निवडणुकीत व 1999 च्या लोकसभा निवडणुकीत शिवराज पाटील यांच्या प्रचारात सक्रिय भाग घेतला. त्यानंतर 2002 ते 2008 दरम्यान युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहिले. लातूर शहर विधानसभा मतदार संघातून ते तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले असून, त्यांनी आघाडी सरकारच्या काळात मंत्रीपद भूषवले आहे.
कोण आहे धीरज देशमुख ?
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे धीरज देशमुख हे पुत्र असून, ते आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत. त्यांनी 2019 मध्ये लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित 1, 21, 482 मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे 6 डिसेंबर 2021 रोजी त्यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
– हे आहे विरोधकांचे प्रमुख कारण
अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे भाजपमध्ये आले, तर संभाजी पाटील निलंगेकरांसमोर ते कडवे आव्हान राहणार आहे. कारण पक्षांतर्गत स्पर्धा वाढू शकते. त्यात एक भाऊ लातूर शहर आणि एक भाऊ लातूर ग्रामीणमध्ये विजयी झालेला आहे. विलासराव देशमुखांचे सुपुत्र म्हणून इथली जनताही त्यांच्यावर प्रेम करते. येणाऱ्या काळात लातूर महापालिकेची निवडणूक आहे. ही पक्षांतर्गत स्पर्धा टाळण्यासाठीच आत्तापासून संभाजी पाटील – निलंगेकर यांनी देशमुखांना केवळ पक्षांतर चर्चेवरून जाहीर विरोध करायला सुरुवात केली आहे.


