लव्ह इन पॉलिटिकल : भाजपाच्या माजी प्रदेशाध्यक्षाने पदाधिकाऱ्यासोबत केले लग्न

लव्ह इन पॉलिटिकल : भाजपाच्या माजी प्रदेशाध्यक्षाने पदाधिकाऱ्यासोबत केले लग्न

-स्वतः मुख्यमंत्री यांनी दिल्या! शुभेच्छा

प्रतिनिधी
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे सुरू असलेला हिंसाचार आणि इतर राजकीय वादामुळे भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष यांच्यातून विस्तवही जात नाही. पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षांचा संघर्षपूर्ण असा इतिहास आणि वर्तमान आहे. यापूर्वी डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेस असा संघर्ष उडाला होता. आता तृणमूल विरुद्ध काँग्रेस आणि भाजपा असा संघर्ष दिसतो. मात्र, आता एका कारणामुळे सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि भाजपाच्या पदाधिकारी रिंकू मजूमदार विवाहबंधनात अडकले आहेत. यानिमित्त मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

घोष आणि मजूमदार यांनी शुक्रवारी (१८ एप्रिल) पारंपरिक पद्धत आणि नोंदणी पद्धतीने लग्न केले. या सोहळ्याला त्यांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. दिलीप घोष यांचे हे पहिलेच लग्न असून मजूमदार यांचे हे दुसरे लग्न आहे. ५० वर्षांच्या मजूमदार यांना पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे.

शुक्रवारी सकाळपासून घोष यांना भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून शुभेच्छा येण्यास सुरुवात झाली. ममता बॅनर्जी यांनी शुभेच्छा संदेशाबरोबर फुले आणि मिठाई पाठवली. तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनीही शुभेच्छा दिल्या; तर मदन मित्रा म्हणाले की, दिलीप घोष यांचे लग्न होत आहे याचा आनंद वाटतो. आता माझी विनंती असेल की, दिलीप दादांनी वहिनींबरोबर (मजूमदार) प्रवास करावा.