राष्ट्रवादीचा हा बडा नेताही म्हणतो, ओबीसी प्रदेशाध्यक्ष झाल्यास मतात वाढ
-एकनाथ खडसे यांचे वक्तव्य
प्रतिनिधी
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी प्रदेशाध्यक्ष झाल्यास मराठ्यांशिवाय इतर जातींच्या मतांची टक्केवारी वाढू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झालेल्या जागाही जिंकता येऊ शकतात, असे छगन भुजबळांना वाटत असावे. त्यामुळे ओबीसी प्रदेशाध्यक्ष व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असावी.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खोली नसलेले मुख्यमंत्री आहेत. उथळ असे आहेत.त्यांचे भाषण, बोलणे कसे आहे. बाबासाहेब भोसलेंपासून मनोहर जोशींपर्यंत अनेक मुख्यमंत्री राज्याने बघितलेले आहे. त्यांची एक इमेज होती. त्यांच्याविषयी आदर, सन्मान होता. शिंदेविषयी काय बाेलले जातेय, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. मुख्यमंत्री शिंदे हे कधी गावाकडे जाऊन शेतीही करतात. ते काहीही करू शकतात.
मी पक्षात नवीन आहे. त्यामुळे मला प्रदेशाध्यक्षपदात स्वारस्य नाही. पक्षात अनेक प्रस्थापित ज्येष्ठ नेते आहेत. १९९५ पासून राजकारणात ओबीसींना स्थान मिळू लागले आणि त्यांची पण ताकद आहे,त्यांना संघटित केले तर निवडणूक जिंकण्याची क्षमता वाढते, हे भाजपमुळे सर्वांच्या लक्षात आले. राष्ट्रवादी काँग्रेसवर हा मराठा समाजाचा पक्ष आहे असा आरोप केला जातो. ती प्रतिमा बदलायची असेल आणि मतदानाची टक्केवारी वाढवायची असेल तर ओबीसी नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद आल्याने फायदा होईल, असे छगन भुजबळ यांना म्हणायचे असेल. माझे मतही त्यापेक्षा काही वेगळे नाही. पण याचा अर्थ असा नाही की, अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष होऊ नये किंवा जयंत पाटलांनी त्या पदावर राहू नये असे आम्हाला वाटते. प्रत्येकाची ताकद असते, फायदे-तोटे असतात. त्या दृष्टीने याकडे पाहिले पाहिजे.
कोणत्याही एका माणसामुळे खूप मोठा फरक पडतो असे होत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याचा पक्षाला फायदा होईल, असे नेतृत्वाला वाटणे साहजिक आहे. खान्देशाचेच उदाहरण घ्या. आज तीन जिल्हे मिळून एकच आमदार आहे. ती संख्या वाढून पाच झाली तरी पक्षाचा फायदाच नाही का? राज्यात प्रत्येक मतदारसंघात मला मानणाऱ्यांची जी काही संख्या आहे त्यानुसार पक्षाला नक्कीच फायदा होईल. पण किती आमदार आणि खासदार वाढतील, असा दावा योग्य होणार नाही.


