राज्यातील नेत्यांची सुरक्षा: काय असते वाय प्लस !!
-नार्वेकरावर शिंदे सरकार खुश
प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे सरकारचे निर्णय एकामागोमाग एक रद्द करण्याचा सपाटा लावलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी आणखी एक धक्का महाविकास आघाडीला दिला. संजय राऊत, भास्कर जाधव, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या अनेक प्रमुख विरोधी नेत्यांची सुरक्षा सरकारने काढून घेतली. तर काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. मात्र रंजक बाब म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षा व्यवस्थेत उलट वाढ करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नार्वेकर यांना आधी ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा होती. आता त्यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा दिली आहे.
-बघा वाय प्लस सुरक्षा?
वाय प्लस श्रेणीमध्ये एक एस्कॉर्ट वाहन आणि वैयक्तिक सुरक्षारक्षकासह निवासस्थानी एक गार्ड कमांडर तसेच चार गार्ड तैनात असतात.
मिलिंद नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळीकीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. गणेशोत्सवात शिंदे नार्वेकरांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते, तर नुकत्याच झालेल्या एमसीएच्या निवडणुकीतही नार्वेकर हे शिंदे-फडणवीस यांच्यासोबत होते.
गेल्याच आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वाढदिवशी मिलिंद नार्वेकरांनी त्यांना जाहीर शुभेच्छा दिल्या आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर फटाके फुटले होते. ज्या शाहांची तुलना उद्धव ठाकरे अप्रत्यक्षपणे आदिलशाह-निजामशाहांशी करतात, तसेच ‘मातोश्री’वरील बंद खोलीतील चर्चांवरुन बोल लावताना दिसतात, त्या शाहांनाच ठाकरेंच्या ‘राईट हँड’ने ट्विटरवरून शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.


