रवी राणा म्हणाले, चमत्कार घडेल, शरद पवार यांच्या सहभागाने मजबूत सरकार
-15 ते 20 दिवसांत उलथापालथ
प्रतिनिधी
अमरावती : येत्या 15 ते 20 दिवसांत राज्यात चमत्कार घडेल. राज्यात आणि केंद्रात शरद पवार यांचा सहभाग असणारे मजबूत भाजप सरकार दिसेल, असा मोठा दावा अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
–केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार येईल
रवी राणा यांनी गणेश उत्सवात विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. या भेटींचा दाखला देत त्यांनी शरद पवार पुढील काही दिवसांतच भाजपसोबत जाणार असल्याचा दावा केला. गणेश उत्सवात मी अनेक मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेतले. या सर्वच गणपतींना मी देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ द्यावी, असे साकडे घातले. त्याचा चमत्कार पुढील 15 ते 20 दिवसांत दिसेल. लवकरच राज्यात व केंद्रात शरद पवारांच्या पाठिंब्याचे मजबूत भाजप सरकार दिसेल, असे रवी राणा म्हणाले.
… तर अजित पवार मुख्यमंत्री
यावेळी त्यांनी अजित पवार यांचे मुख्यमंत्री होणे अशक्य नसल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. ते आता उपमुख्यमंत्री झालेत. अजित पवार विरोधी पक्षनेते होते. ते ही आता उपमुख्यमंत्री झालेत. ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री असणारे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झालेत. राजकारण कोणतीही गोष्ट अशक्य नसते. त्यामुळे शरद पवार मोदी सरकारसोबत आले तर अजित पवार मुख्यमंत्री होणे शक्य आहे, असेही रवी राणा यावेळी म्हणाले.
–राणांचा घेतला समाचार
दुसरीकडे, रवी राणा यांच्या या दाव्याचा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी खरपूस शब्दांत समाचार घतेला आहे. रवी राणा यांनी असे विधान करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती का? तसे असेल तर रवी राणा यांच्या या दाव्यामुळे भाजपने केवळ सत्तेसाठी हे फोडाफोडीचे राजकारण केल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.


