या ७९ जागा भाजपाला काढणे महत्वाचे, अन्यथा सरकार अश्यक्य

या ७९ जागा भाजपाला काढणे महत्वाचे, अन्यथा सरकार अश्यक्य

-भाजपाच्या गोटातही धाकधूक

प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपला २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील ३०३ जागांच्या यशाची पुनरावृत्ती करून सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवायची असेल तर दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तरेतील ७९ जागा कळीच्या ठरणार आहेत. या जागा गमावल्या तर भाजपला बहुमत मिळणे कठीण होऊ शकते.

२०१९ मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळालेल्या २२४ जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक ४० जागा उत्तर प्रदेशातील आहेत. त्याखालोखाल गुजरात (२६), मध्य प्रदेश (२५) आणि राजस्थान (२३) या राज्यांत भाजपला जास्तीत जास्त जागा मिळाल्या होत्या. तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवून भाजपेतर पक्षांनी ११९ जागा जिंकल्या होत्या. देशभरातील ५४३ जागांपेकी ३४३ जागांवर ५० टक्के मतदान झाले होते.

दिल्लीचा गड नेमका कुणाकडे?

दिल्लीतील सातही मतदारसंघांमध्ये भाजपला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मिळाली आहेत. २०१९ मध्ये दिल्लीत भाजपची मतांची टक्केवारी सरासरी ५६ वर पोहोचली होती. दिल्लीच्या उत्तर-पूर्व मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांच्यामुळे भाजपचे मनोज तिवारी यांच्याविरोधात वातावरण निर्मिती केली असली तरी २०१९ मध्ये तिवारींना ५४ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला २९ टक्के, तर ‘आप’ला १३ टक्के म्हणजे ‘इंडिया’ आघाडीला ४२ टक्के मते मिळाली होती. भाजप व ‘इंडिया’ यांच्यातील मतांचे अंतर १२ टक्के असून मनोज तिवारींना पराभूत करण्यासाठी कन्हैय्या कुमारांसाठी ‘आप’ला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. हीच स्थिती इतरत्र असल्यामुळे भाजप २२४ जागांबाबत निश्चिंत असल्याचे मानले जाते.

पाच वर्षांपूर्वी भाजपने एकूण ३०३ जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळवून भाजपने ७९ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे या जागा भाजपसाठी पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे मानले जाते. या जागांवर भाजप व ‘इंडिया’तील घटक पक्षांमध्ये तगडी लढत होऊ शकते. २०१९ मध्ये ‘एनडीए’ व ‘इंडिया’तील घटक पक्षांनी २०० जागांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळवून विजय मिळवला होता. या जागा यावेळीही दोन्ही आघाड्यांसाठी खुल्या असल्याने त्यातील अधिक जागा जिंकणारी आघाडी बहुमताचा आकडा पार करू शकेल.