या राज्यात भाजपाला धक्का : तीन दशकांची साथ तुटली

या राज्यात भाजपाला धक्का : तीन दशकांची साथ तुटली

-दिग्गजांचीही पक्षाला सोडचिठ्ठी

प्रतिनिधी
नवी दिल्ली : २०१४ मध्ये काँग्रेसला सत्तेतून बाजूला सारून भाजपाने केंद्रासह बहुतांश राज्यांमध्ये आपले बस्तान बसवले. गेल्या दशकभरात अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या मूळ पक्षांमधून भाजपामध्ये प्रवेश केला. यादरम्यान बाहेरून आलेल्या नेत्यांशी सूर जुळत नसल्याने भाजपातील काही दिग्गजांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ईशान्य भारतातील भाजपाचा गड समजला जाणाऱ्या आसाममध्ये नुकतीच याची प्रचिती आली. जवळपास तीन दशकांहून अधिक काळ भाजपात असलेल्या माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्याने गुरुवारी (तारीख ९ ऑक्टोबर) पक्षाच्या प्राथामिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नागांव लोकसभा मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजेन गोहेन यांनी गुवाहाटी येथील पक्षाच्या मुख्यालयात आपला राजीनामा सुपूर्द केला.

भाजपाला ईशान्य भारतात बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षातील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आसाममधील भारतीय जनता पक्षात सध्या दोन गट पडले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ज्येष्ठ नेते गोहेन हे भाजपामधील अंतर्गत वादाचा चेहरा झाले होते. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी त्यांचे संबंध ताणले गेले होते. २०१५ मध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेल्या सरमा यांनी पक्षात चांगलेच बस्तान बसवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील नवीन फळीतील नेत्यांचे पक्षातील जुन्या नेत्यांबरोबर सूर जुळत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यातून सुरू झालेल्या राजकीय संघर्षातून राजेन आणि त्यांच्या १७ समर्थकांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री सरमा यांच्या गटात जयंता मल्ला बरुआ, पीयूष हजारिका आणि अजंता नेओग यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश आहे. आसाममधील मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. राजेन गोहेन पहिल्यांदा १९९९ मध्ये नागांव लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २०१९ पर्यंत त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. २०१६ मध्ये मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. २०२४ मध्येही राजेन यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही. विशेष बाब म्हणजे काँग्रेसने या दोन्ही निवडणुकीत या मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला.