या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षने केले थेट राष्ट्रवादीला ‘लक्ष्य’
– म्हणाले, पुन्हा राष्ट्रवादीमध्ये महानाट्य होईल
प्रतिनिधी
नागपूर : ओबीसी नेते राष्ट्रवादी सोडून जात आहे. म्हणून त्यांच्या पक्षात ओबीसी प्रदेशाध्यक्ष असावा, अशी मागणी पुढे आली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा महानाट्य होईल आणि त्याचा शेवट शरद पवार करतील, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी ओबीसी विरोधी आहे. त्यामुळे आता त्यांना महाराष्ट्रात काहीही वाव नाही. त्यांच्याकडे असलेले मोठे ओबीसी नेते आता भाजपमध्ये येत आहेत. येत्या रविवारी पूर्व विदर्भावर मोठा प्रभाव असणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदाची मागणी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच नाही तर राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. तेव्हापासून विविध चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर टिका केली आहे. शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हाच मी सांगितले होते की, हे घरगुती नाटक आहे. तेव्हाच शरद पवारांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांना कार्यकारी अध्यक्ष नेमायचे होते. पण त्यांनी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांना नेमले. तेव्हाच त्यांच्यात आलबेल नाही हे स्पष्ट झाले होते असा थेट आरोप बावनकुळे यांनी केला.
विरोधकांनी कितीही वज्रमूठ बांधली तरीही मोदी जगातले सर्वोत्कृष्ट प्रशासक म्हणून समोर आले आहेत. 2024 मध्ये एनडीए 400 च्या पार झाल्याशिवाय राहणार नाही इतकी ताकद मोदींच्या नेतृत्वात तयार झाली आहे. विरोधकांची पुढची पिढी धोक्यात आली आहे. म्हणून आज एकत्र आलो नाही, तर आमचे सर्वकाही उद्ध्वस्त होईल आणि आपले गैरव्यवहार उघडकीस आल्याशिवाय राहणार नाहीत अशी भीती विरोधकांना आहे, असे बावनकुळे म्हणाले.
–काँग्रेस हे बुडते जहाज
आपसातील वादातच ते संपणार आहेत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षांना निलंबित केले आणि केंद्रातील त्यांच्या नेतृत्वाने प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला स्थगिती दिली. पक्षाच्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही न केल्याचा ठपका प्रदेशाध्यक्षांवर ठेवण्यात आला. यावरून प्रदेशाध्यक्षाला त्यांच्या पक्षात काय किंमत आहे, हे दिसून आले, असे म्हणत आमदार बावनकुळेंनी नाव न घेता पटोलेंवर निशाणा साधला.


