या नेत्यांची दांडी; नागपुरात प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक

या नेत्यांची दांडी; नागपुरात प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक

कारण काय, काहींनी स्पष्टच सांगितले

गजानन ढाकुलकर/ विवेक पाटील
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक मंगळवारी नागपुरात झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे महाराष्‍ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्यासह सर्व बैठकीला उपस्थित होते. पण दोन माजी मुख्यमंत्र्यांसह एक माजी मंत्री या बैठकीला आले नाही. उपस्थितांपेक्षा अनुपस्थितीची चर्चा आज राणीकोठी परिसरात रंगली होती.

बैठकीला माजी मंत्री आमदार सुनील केदार, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे, नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, कार्याध्यक्ष नसीम भाई, आमदार प्रणिती शिंदे, संग्राम धोपटे, सर्व आमदार, महासचिव, सचिव, प्रदेश उपाध्यक्ष हजर आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर अनुपस्थित राहिले. प्रदेश प्रभारी एच. के. पाटील हेसुद्धा अनुपस्थित आहेत. त्यामुळे या नेत्यांनी बैठकीला दांडी मारल्याची चर्चा राणी कोठी परिसरात चांगलीच रंगली होती. पण या चर्चेत काही दम नाही, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी निवडक माध्यमांशी भ्रमणध्वनीवर बोलताना दिली. माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि डॉ. नितीन राऊत हे दोघे उशिरा बैठकस्थळी दाखल झाले.

माणसाची प्रकृती केव्हा बिघडेल, हे त्याच्या हातात नसते. बैठकीला येण्याची माझी पूर्ण तयारी होती. पण ऐन वेळेवर प्रकृती बिघडली आणि नांदेड ते नागपूर हा जवळपास पाच ते साडेपाच तासांचा प्रवास आहे. थंडीचा कडाका वाढला आहे, अशा परिस्थितीत तब्येतीच्या बाबतीत जोखीम पत्करू शकत नाही. त्यामुळे नागपूरला येण्याचा बेत रद्द केला. भलत्या-सलत्या चर्चा करायला काय लागतं हो…तशा बातम्या पसरवायलाही काही लागत नाही. पण सत्यस्थिती जाणून न घेता, चर्चा आणि बातम्या पसरविल्या जातात, हे योग्य नाही अशी बाजू चव्हाण यांनी मांडली.

पक्ष पातळीवर विविध बैठका, विविध ठिकाणांवर होत असतात. प्रत्येकच बैठकीला, प्रत्येक वेळी प्रत्येकाला उपस्थित राहणे बरेचदा शक्य होत नाही. आजही मी बैठकीला हजर असतो, तर मोठी बातमी झाली नसती. पण गैरहजर आहो, तर लगेच चर्चा सुरू झाल्या, बातम्या सुरू झाल्या. आमचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होताच सहभागी झालो. पूर्ण वेळ यात्रेत होतो. त्यानंतर तरी वायफळ चर्चा थांबायला हव्या होत्या. चर्चा कोण करतो आणि कोण घडवतो, हे तपासून बघितले पाहिजे. भारत जोडोनंतर आता काय सिद्ध करायचे राहिले आहे, असा प्रश्‍न अशोक चव्हाण यांनी करून या चर्चांमध्ये काही दम नसल्याचे सांगितले. आमदार यशोमती ठाकूर यांनी सासूबाईंची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे नाशिकला आल्याचे सांगितले.