या गद्दाराचे करायचे काय ? शरद पवारांनी थेट मंचावरून आदेशचं दिले…!
-२०१९ पासून राज्याच्या राजकारणाने वेगळ्या वाटेवर
प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या. 2019 पासूनच राज्याच्या राजकारणाने वेगळ्या वाटेवर प्रवास सुरू केला. जिवलग मित्र एकमेकांचे शत्रू झाले. तर दोन-अडीच वर्षांपूर्वी राज्यातील दोन मोठ्या पक्षांना फुटीचा फटका बसला. शिवसेना दुभंगली. तर अजित पवार समर्थकांसह महायुतीच्या खेम्यात दाखल झाले. राष्ट्रवादीत उभी फूट पडली. राजकारणात गद्दार हा परवलीचा शब्द झाला. या गद्दारांचे करायचं काय असा सवाल भरसभेत शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर पवारांनी थेट असा आदेश दिला.
२०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपात फाटलं. त्यानंतर पहाटेचा भाजप-राष्ट्रवादीचा शपथविधी झाला काय, अवघ्या काही तासाचं सरकार आलं काय, राष्ट्रपती राजवट लागली काय आणि नंतर धक्कातंत्र देत महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेवर आलं काय, या घडामोडी वेगानं घडल्या. त्यानंतरही राज्यातील धक्कातंत्र कमी झाले नाही. राजकारणात हादरे नाही तर भूकंप आले. शिवसेनेत पहिला सुरूंग लावण्यात भाजपाला मोठं यश आले. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने विश्वासू शिलेदार महायुतीच्या गोटात आला. महाविकास आघाडीचे सरकार गडगडले आणि महायुतीचे सरकार आले. त्यानंतर ऑपरेशन लोट्सचा प्रयोग राष्ट्रवादीवर झाल्याचा आरोप करण्यात आला. राष्ट्रवादीत उभी फूट पडली. या दोन घटनेनंतर राज्याच्या राजकारणात, पन्नास खोके एकदम ओके, गद्दार हे परवलीचे शब्द झाले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा राग दिसून आला. गद्दारांना धडा शिकवण्याची भाषा विधानसभेच्या प्रचारादरम्यान वारंवार झाली.
योगायोग म्हणजे वाईमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे. सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघापैकी वाई हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. वाई मतदारसंघात शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आहे. या मतदारसंघात महायुतीमधील राष्ट्रवादीकडून आमदार मकरंद पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडून अरुणादेवी पिसाळ या उमेदवार आहेत.
सातारा जिल्ह्यातील वाई मतदारसंघात शरद पवार यांची प्रचार सभा आज झाली. या प्रचार सभेत शरद पवार हे मार्गदर्शन करत होते. त्यावेळी त्यांच्याकडे एक चिठ्ठी आली. पवारांनी ही चिठ्ठी वाचून दाखवली. त्यात आता गद्दारांचं काय? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवारांनी काय करायचं गद्दारांचं असा प्रश्न विचारला आणि लागलीच पाडा पाडा पाडा, असे वक्तव्य केले.


