या कॅबिनेट मंत्र्याचे वक्तव्य : ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी…?
-मुंबईतील मोर्चावरून उत्तर
प्रतिनिधी
नागपूर : मतदार याद्यांमधील घोळाच्या विरोधात शनिवारी महाविकास आघाडीतर्फे मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते व महसूल मंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले, त्यावेळी मतचोरी झाली होती का ? असा सवाल त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रात मतचोरीची चर्चा सर्वाधिक आहे. बिहार निवडणूक आणि राज्यात पुढच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील घोळ विरोधी पक्षाकडून चव्हाट्यावर आणले जात आहे.
काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी कशा प्रकारे मतदार याद्यांमधील नावे वगळण्यात आली व कशा प्रकारे नावे त्यात समाविष्ठ करण्यात आली याचे सादरीकरण करून निवडणूक आयोगाला काही प्रश्न केले होते. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही मुंबईतील मतघोटाळ्याबाबत सादरीकरण केले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका व्यक्त करणारे सादरीकरण केले होते. या सर्व बाबींच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला व यादीतील घोळ दुरुस्त करा व नंतरच निवडणुका घ्या, अशी मागणी केली. नेहमीप्रमाणे निवडणूक आयोगाच्यावतीने भाजपच प्रतिक्रिया देत सुटला आहे.
या पक्षाचे नेते व महसूल मंत्री चंद्रशेकर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले “ लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडन आले, तेव्हा मतचोरी झाली होती का ? दुबार आणि तिबार नावे मतदार यादीत नसावी ही आमचीही भूमिका आहे. निवडणुकीच्या काळात मोर्चा काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा महाविकास आघाडीचा केविलवाणा प्रयत्न आहे. अशा मोर्चाला राज ठाकरे यांनी जाणे आश्चर्यकारक आहे.


